महिला विशेष असलेले माटुंगा स्थानक लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:05 AM2018-01-09T03:05:17+5:302018-01-09T03:05:33+5:30
महिला विशेष असलेल्या मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. स्थानकातील विविध कामांसह स्थानकातील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला अधिकारी-कर्मचारी यांच्यावर आहे.
मुंबई : महिला विशेष असलेल्या मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. स्थानकातील विविध कामांसह स्थानकातील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला अधिकारी-कर्मचारी यांच्यावर आहे. महिलांमार्फत कामकाज करणारे स्थानक म्हणून देशातील पहिले उपनगरीय रेल्वे स्थानकाचा मानदेखील माटुंगा स्थानकाला मिळाला आहे.
जुलै २०१७ रोजी ३४ महिलांची नियुक्ती करून हे स्थानक महिला विशेष स्थानक घोषित करण्यात आले. माटुंगा स्थानकाजवळ विविध महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ येथे सर्वाधिक असते. यामुळे स्थानकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलातर्फे महिला अधिकारी-कर्मचा-यांची मागणी करण्यात आली होती. माटुंगा स्थानकावर सद्य:स्थितीत २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षकांसह ११ तिकीट बुकिंग क्लार्क, ७ तिकीट तपासनीस, अन्य कामांसाठी ५ कर्मचारी आणि २ उद्घोषणा करणा-या महिला यांचा समावेश आहे. स्थानक-प्रवासी सुरक्षिततेसाठी आरपीएफच्या ५ महिला अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.