मुंबई : आपल्याबरोबर असणारी स्त्री ही आपली आई, बायको, मुलगी, बहीण, मैत्रीण, सहकारी किंवा अजून कोणी असू शकते, तिच्याकडे या सगळ्या नात्यांच्या पलीकडे जाऊन तिला माणूस म्हणून स्वीकारले जाण्याची गरज आहे. हाच संदेश मुंबईच्या मोरया या ढोल-ताशा पथकाने आपल्या उत्कृष्ट आणि धडाकेबाज सादरीकरणातून दिला. हे सादरीकरण त्यांनी महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिनाच्या निमित्ताने मुंबईतील ब्रिटिश हाय कमिशनच्या समन्वयाने वांद्रे-कुर्ला संकुल येथे केले.वर्ल्ड बँकेच्या एका अहवालानुसार महिला सबलीकरणासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यास अपयश येते आहे. या अहवालानुसार जगातील ३५ % स्त्रिया आजही आपल्या साथीदाराच्या शारीरिक आणि लैंगिक हिंसाचाराला सामोऱ्या जात आहेत, तर ७ % स्त्रिया या इतर कोणाकडून तरी होणाºया शोषणाला बळी पडत आहेत. जागतिक स्तरावर ३८ % स्त्रियांची हत्या ही त्यांच्याच साथीदाराकडून होत असते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनकडून महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी, तसेच त्यांच्या सुरक्षेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, त्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महिला सबलीकरण आणि कौटुंबिक हिंसाचाराबाबत जागृती करणे हा उद्देश असणाºया धारावीतील कार्यरत असणाºया स्नेहा संस्थेने छोटीशी नाटुकली सादर करून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला.महिलांचे सबलीकरण आणि त्यांना असलेले कायदेशीर हक्क त्यांना समजावून सांगण्याचे काम स्नेहा करत असून, त्यासाठी महिलांनाही हिमतीने पुढे येण्याचे आवाहन स्नेहामार्फत केले गेले. यानंतर, महिलांना स्वसंरक्षणाचे धडेही ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन स्टाफकडून देण्यात आले.स्त्रियांचे सबलीकरण होणे म्हणजे तिचे व्यक्तिमत्त्व एक माणूस म्हणून विकसित करायचे व कोणत्याही भेदभावाशिवाय प्रगती करण्याची संधी मिळायला हवी. महिलांचा सहभाग, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, त्यांच्या क्षमतांचे संवर्धन आणि या सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती गरजेची आहे आणि या उपक्रमातून आम्ही तोच प्रयत्न करणार आहोत.- बेथ येतेस, हेड आॅफ पोलिटिकल अँड बायलॅटरल अफेअर्स,वेस्टर्न इंडिया, ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन
महिला हिंसाचार निर्मूलन दिन : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुढाकार गरजेचा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 3:47 AM