नवी मुंबई : ऐन सुटीच्या हंगामात नागरिकांना सोयीसुुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या वंडर्स पार्कला अखेर महापौर सागर नाईक यांनी सोमवारी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच बंद असलेल्या राईड आणि इतर सुविधा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना यावेळी दिल्या. नेरूळमधील महापालिकेच्या वंडर्स पार्कची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. येथील चारही राईड बंद आहेत. टॉय ट्रेनही बंद आहेत. तलाव कोरडे पडले आहेत. मुलांच्या माहितीसाठी तयार केलेले ट्रॅफिक गार्डनही कार्यरत नाही. या गैरसोयीविषयी लोकमतने आवाज उठविला होता. यानंतर आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पार्क पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सोमवारी महापौर सागर नाईक यांनी येथे भेट दिली. येथील गैरसुविधेविषयी त्यांनीही नाराजी व्यक्त केली. प्रसाधनगृहाची योग्य देखभाल केली जात नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. येथील स्वच्छता, राईड, टॉय ट्रेन व इतर समस्यांविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. वंडर्स पार्कमध्ये सर्व सुविधा पूर्ववत करण्यात येणार आहेत. देखभालीसाठी खाजगी एजन्सीच्या नियुक्तीसाठी निवीदा काढण्यात आली आहे. एजन्सी नेमल्यानंतर फुडकोर्टही सुरू केले जाईल. तोपर्यंत महापालिका प्रशासन देखभालीची जबाबदारी पार पाडणार असल्याचे सागर नाईक यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक संदीप सुतार, माजी नगरसेवक व उद्यानाच्या सुविधेसाठी पाठपुरावा करणारे रविंद्र इथापे, कार्यकारी अभियंता संजय देसाई, उपआयुक्त बाबासाहेब राजळे, विभाग अधिकारी राजेंद्र सोनावणे व इतर अधिकारी उपस्थित होते.
वंडर्स पार्कच्या ‘राइड’ वेग घेणार
By admin | Published: November 04, 2014 12:39 AM