बसगाड्यांचे फिरते शौचालय ‘बेस्ट’ नव्हे; विरोधकांचा संतप्त सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:49 AM2019-02-15T05:49:46+5:302019-02-15T05:50:08+5:30
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेतून मदत मिळवून देण्यास सत्ताधारी शिवसेनेला अपयश आले आहे. स्वपक्षीय नगरसेवकाकडून आलेल्या एका अजब सल्ल्याने शिवसेना अडचणीत आली आहे.
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेतून मदत मिळवून देण्यास सत्ताधारी शिवसेनेला अपयश आले आहे. स्वपक्षीय नगरसेवकाकडून आलेल्या एका अजब सल्ल्याने शिवसेना अडचणीत आली आहे. भंगारात काढण्यात येणाऱ्या दहा बसगाड्यांचे रुपांतर फिरत्या शौचालयात करण्याची सुचना पुढे आली आहे. विरोधकांनी या ठरावाच्या सुचनेला तीव्र विरोध केला आहे़ यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी होणार आहे.
आर्युमान संपलेल्या ११३ बसगाड्या बेस्ट उपक्रमाने गेल्या वर्षभरात भंगारात काढल्या. यापैकी दहा बसगाड्यांचे रुपांतर फिरत्या शौचालयात करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे महासभेपुढे केली आहे. मुंबईत मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याने अशी शौचालये प्रवाशांना दिलासा देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. बेस्ट बसगाड्या या मुंबईची शान आहे़ त्यात शौचालय या कल्पनेनेच नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
मुंबईची ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी धोकादायक आहे, असे मत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले आहे. मेट्रो स्थानक व रस्त्यांवर शौचालय बांधणे पालिकेची जबाबदारी आहे. बेस्ट बसची जगभरात एक वेगळी ओळख आहे़ भंगारात काढलेल्या बेस्ट बसमध्ये फिरते शौचालय केल्यास, बेस्टच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे मत भाजपाचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केले.
प्रवाशांच्या सोयीसाठी फिरते शौचालयगेल्या वर्षी ११३ बसगाड्या भंगारात काढण्यात आल्या होत्या. या बदल्यात नवीन बसगाडी खरेदी करण्यात आलेली नाही. प्रवाशांना बस स्टॉपवर तासन्तास बसची वाट पाहावी लागत आहे. मेट्रोच्या कामामुळे बºयाच ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अशावेळी वरिष्ठ नागरिक व मधुमेहग्रस्त प्रवाशांचे हाल होतात. त्यांच्यासाठी फिरते शौचालये असावे, असे मत पडवळ यांनी ठरावाच्या सुचनेत व्यक्त केले आहे. ही ठरावाची सुचना येत्या पालिका महासभेत चर्चेसाठी येणार आहे.
बेस्ट उपक्रमाने भंगारात काढलेल्या काही बसगाड्यांचे फिरत्या स्वच्छतागृहात रूपांतर करून महामार्ग, रस्ते, लहान मोठ्या गर्दीच्या रस्त्यांवर उपलब्ध करून देण्यात यावेत.
- सचिन पडवळ, नगरसेवक
बेस्ट बसगाड्या मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे. बेस्टला एक वेगळी ओळख आहे. त्यात फिरते शौचालये योग्य नव्हे. या ठरावाच्या सुचनेला आम्ही विरोध करणार.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते