भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही, आम्हाला सिरियसली घ्यावे - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 06:29 PM2024-02-24T18:29:30+5:302024-02-24T18:30:20+5:30
Ramdas Athawale : लोकसभेसाठी तिकीट नाही दिलं तरी मी एनडीएमधून बाहेर पडण्याचा संबंध नाही, असे विधान रामदास आठवले यांनी केले.
Ramdas Athawale (Marathi News) मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयचे प्रमुख व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. आता वातावरण चांगले आहे. मला शिर्डीतून निवडून येण्याची संधी आहे. मी भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्हाला लोकसभेसाठी जागा द्यावी हा आमचा आग्रह आहे. भाजपाने आम्हाला सिरियसली घ्यावे. लोकसभेसाठी तिकीट नाही दिलं तरी मी एनडीएमधून बाहेर पडण्याचा संबंध नाही, असे विधान रामदास आठवले यांनी केले.
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले म्हणाले, विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देत आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी ताकदीने उभे राहिलो आहोत. एनडीएने आम्हाला एक जागा तरी सोडावी. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला फायदा झाला होता. आमच्या पक्षाला विसरून चालणार नाही. त्यामुळे माझी लोकसभेसाठी शिर्डीच्या जागेवरून उभे राहण्याची इच्छा आहे. आमचे नेते म्हातेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. त्यांनी आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले.
याचबरोबर, मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल आणि एप्रिलमध्ये निवडणुका होतील. आम्ही ४०० जागा जिंकू. अलीकडे झालेल्या पाचही राज्यात भाजपाला चागलं यश मिळालं. मागच्या वर्षात केलेली काम, महिलांसाठी केलेली काम, ३७० कलम हटवण्याचं काम केले. आणखीही कामे करण्यात आलेली आहेत, असे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, मराठा आरक्षणाबाबतही रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावे. वयोवृद्ध नागरिकांना उपोषण करायला लावू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
दरम्यान, रामदास आठवले यांनी शिर्डी आणि सोलापूर लोकसभेची जागा महायुतीकडे मागितली आहे. ते स्वत: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, भाजपाने अद्याप जागावाटपासंदर्भात कोणत्याही शब्द आरपीआयला दिलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले हे कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.