Join us

'जास्त काळ वाट बघणार नाही’; नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 7:30 AM

विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई : अजित पवारांसह ज्या नऊ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, मात्र त्यांच्यासाठीही फार काळ थांबणार नाही. एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या क्षणी नऊ आमदारांनी शपथ घेतली त्याच क्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे, असेही ते म्हणाले.

मी जो काही आहे, ते माझे गुरू पवारांमुळेच : जयंत पाटीलमी जो काही आहे, ते माझे गुरु शरद पवार यांच्यामुळेच ! शरद पवारांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा ! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत पवारांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्त्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवले, घडवले आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा दिवस असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

येत्या ५ जुलैला पवारांनी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे जयंत पाटील म्हणाले. नऊ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल, असेही पाटील यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अनेक आमदार संपर्कात : देशमुख‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते अजूनही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून आम्हाला परत यायचं आहे, असे सांगत आहेत. त्यामुळे याबाबत एक दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. अनेक आमदार परत राष्ट्रवादीमध्ये आलेले दिसतील,’ असे मत राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :जयंत पाटीलअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार