मुंबई : देशासह राज्यात वाढत्या कमाल तापमानाने कहर केला असून, उत्तर कोकणात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा ३८ अंशांवर पोहोचला आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासांपासून मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस आणि गारांची नोंद झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशांवर खाली उतरले असले तरी उन्हाचा तडाखा कायम आहे. परिणामी मुंबईसह राज्यभरात हवामानात वेगाने बदल होत असून, ऊन, गारा आणि पावसासारख्या तिहेरी वातावरणामुळे महाराष्ट्र होरपळून निघतो आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. बीड, लातूर, अहमदनगर, नांदेड, सातारा, जालना, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, कोल्हापूरला वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, तुरळक ठिकाणी पावसासह गारांची नोंद झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.>शहरांचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये.मुंबई ३२.१, माथेरान ३२.४,बीड ३१.८, नाशिक ३३.२, सोलापूर ३४.६, कोल्हापूर ३३.८, पुणे ३३.८, परभणी ३५.६, सांगली ३४.८, जळगाव ३५.६, सातारा ३३.८
ऊन, वारा, गारा आणि पाऊस; बदलत्या हवामानाचा राज्याला बसतोय फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:10 AM