Join us

गाण्यातील 'बॉम्बे' शब्दाला सेन्सॉर बोर्डाची कात्री

By admin | Published: February 02, 2015 3:35 PM

मुंबईतील एका संगीतकाराच्या गाण्यातील 'बॉम्बे' या शब्दाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याचा प्रकार समोर आल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - लीना सॅमसन यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे चर्चेत आलेल्या सेन्सॉर बोर्डाने आता आणखी एक वाद निर्माण केला आहे. मुंबईतील एका संगीतकाराच्या गाण्यातील 'बॉम्बे' या शब्दाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गाण्यात बॉम्बे शब्दामुळे नेमका काय वाद झाला असता यावर सेन्सॉर बोर्डाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचे संबंधीत संगीतकाराने म्हटले आहे. 
मुंबईतील संगीतकार मिहीर जोशी यांचे मुंबई ब्लू नामक पहिलेवहिले अल्बम गेल्या वर्षी प्रकाशित झाले होते. हा अल्बम आता व्हिडीओ रुपात टीव्हीवर प्रसारीत करण्यासाठी मिहीर जोशी आणि अल्बम प्रकाशकांनी व्हिडीओची प्रत सेन्सॉर बोर्डाकडे पाठवली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने या गाण्यातील बॉम्बे या शब्दाला आक्षेप घेत या शब्दाचा भाग वगळला आहे. यावर मिहीर जोशी यांनी संताप व्यक्त केला. माझे गाणे गेल्या अनेक महिन्यांपासून यूट्यूबवर आहे. यामधील बॉम्बे या शब्दावर कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र आता सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप घेण्याचे काय कारण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सेन्सॉर बोर्डाने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
काय आहे गाण्यात ?
मिहीर जोशी यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी 'सॉरी' नामक एक गाणे तयार केले आहे. या गाण्यामध्ये दिल्लीतीली निर्भया बलात्कार प्रकरण, मुंबईतील शक्तीमिल सामूहिक बलात्कारप्रकरण अशा विविध शहरांमधील बलात्काराच्या घटनांचा संदर्भ जोडण्यासाठी 'दिल्ली टू बॉम्बे' असा शब्द वापरला आहे. हे गाणे वडिल तिच्या मुलीसाठी बोलताना दाखवण्यात आले आहे.