Join us  

'वर्षा'वरील बैठकीत अब्दुल सत्तारांचा पारा चढला अन् शिवीगाळ केली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 9:05 AM

या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील कामांची यादी देऊनही ती पूर्ण न झाल्यानं ते संतापले होते.

मुंबई - एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार मंत्री होण्यापूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सत्तारांच्या मुलांची नावं टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात समोर आल्यानं वाद निर्माण झाला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदावर वर्णी लावल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. आता मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादात अडकले आहेत. वर्षावरील बैठकीत अब्दुल सत्तार यांचा पार चढल्याने त्यांनी शिवीगाळ केल्याची बातमी समोर आली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला १०० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेतला जात होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी सत्तारांनी खतगावकर यांना शिवीगाळ केली. शिंदे गटाच्या आमदार, खासदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला जात होता. 

या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील कामांची यादी देऊनही ती पूर्ण न झाल्यानं ते संतापले होते. विकासकामांचा आढावा घेताना रखडलेल्या कामामुळे सत्तार भडकले होते. यात मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवासोबत त्यांची खडाजंगी झाली. हा विषय नंतर सोडवता येईल असं सांगत इतर आमदार, मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु रागात ते बैठकीतून निघून गेले. घडलेल्या या प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तारांच्या वागणुकीवर नाराज झाल्याचं पुढे येत आहे. तर या बैठकीनंतर पत्रकारांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांना प्रश्न विचारला परंतु त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. 

आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की, अब्दुल सत्तार हे शांत आणि संयमी नेते आहेत. असं काही करतील वाटत नाही. अब्दुल सत्तार काम करणारे नेतृत्व आहे. अपक्ष उभे राहिले तरी निवडून येतील. कदाचित कधी माणूस टेन्शनमध्ये असतो. चुकून एखादं वाक्य निघालं असेल तर त्याबाबत मला माहिती नाही असं त्यांनी सांगितले. मात्र अब्दुल सत्तारांनी केलेली शिवीगाळ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. 

टॅग्स :अब्दुल सत्तारएकनाथ शिंदे