Join us

'ठाकरे' वरून 'राज'कारण जोरात; संजय राऊत मनसैनिकांच्या रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 2:03 PM

मनसेचे नेते आणि 'ठाकरे'चे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मनसैनिक संजय राऊत यांना लक्ष्य करताहेत.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावाती जीवनपट उलगडून दाखवणारा 'ठाकरे' हा सिनेमा उद्या - २५ जानेवारीला प्रदर्शित होतोय. त्याबद्दल एकूणच महाराष्ट्रवासीयांना आणि खास करून शिवसैनिकांना प्रचंड उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हा चित्रपट सैनिकांमध्ये एक नवा जोश भरेल आणि शिवसेनेचा 'आवाssज' घुमेल, या सूप्त उद्देशानेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या सिनेमाची निर्मिती केली आणि तारीखही ठरवली. परंतु, 'ठाकरे' चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगदरम्यान घडलेल्या एका 'सीन'मुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संजय राऊत यांच्याविरोधात सोशल मीडियावर मोहीमच उघडल्याचं पाहायला मिळतंय. मनसेचे नेते आणि 'ठाकरे'चे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मनसैनिक संजय राऊत यांना लक्ष्य करताहेत. त्यामुळे 'ठाकरे' मनसेसाठीच, राज ठाकरेंची प्रतिमा उंचावण्यासाठीच अधिक फायदेशीर ठरतो की काय, अशीही कुजबूज ऐकायला मिळतेय.

'ठाकरे' सिनेमाचं स्क्रिनिंग बुधवारी रात्री वडाळ्यातील कार्निव्हल आयमॅक्समध्ये झालं. शिवसेना नेते, राजकारणातील मान्यवर, सिनेसृष्टीतील तारे-तारका आणि इतरही सेलिब्रिटींना या शोचं आमंत्रण होतं. सगळ्यांसाठी आसनंही आरक्षित ठेवण्यात आली होती. परंतु, दिग्दर्शक अभिजीत पानसे सहकुटुंब स्क्रिनिंगला पोहोचले, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांसाठी जागाच नव्हती. त्यामुळे ते नाराज होऊन, सिनेमा न पाहताच निघून गेले. संजय राऊत यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण 'मनसे' दुखावले गेल्यानं ते थांबले नाहीत. या प्रसंगाचा व्हिडीओही व्हायरल होतोय. 

या प्रकारानंतर, इतके दिवस शांत असलेले मनसैनिक रागाला वाट मोकळी करून देताना दिसताहेत. #ISupportAbjijitPanse असा हॅशटॅग फेसबुक, व्हॉट्स अॅपवर फिरतोय. शिवसेनेनं स्वार्थासाठी अभिजीत पानसे यांचा कसा वापर केला, आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी त्यांना कसं दूर केलं, मग मनसेनं त्यांना कसं सामावून घेतलं, स्वातंत्र्य दिलं, यावरचा एक लेखही व्हायरल होतोय. त्यात संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये राऊत यांनीच पुढे-पुढे केलं, दिग्दर्शकाला योग्य मान दिलाच नाही, असे काही मुद्दे मांडण्यात आलेत.     

 राज ठाकरे हे कलावंत, चित्रपटप्रेमी आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर आहे. म्हणूनच, 'ठाकरे' या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यात त्यांनी कुठेच आडकाठी केली नाही, असं नमूद करत राज यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्नही मनसेकडून होतोय. 

दरम्यान, ठाकरे या चित्रपटाला शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं काल शिवसेनेला टोमणा मारला होता. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'ठाकरे' चित्रपटाला मनसे शुभेच्छा, असा उल्लेख करत त्यांनी संजय राऊत यांना बाण मारला होता. येत्या काळात ही टोलेबाजी आणखी रंगण्याची चिन्हं आहेत. 

टॅग्स :ठाकरे सिनेमासंजय राऊतराज ठाकरेमनसे