'...तर इंदू मिल स्मारक कामाबाबत दुसऱ्या पर्यायाचा विचार करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 01:33 AM2020-02-26T01:33:24+5:302020-02-26T06:59:57+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपनीला दिलेल्या कामावरून मतमतांतर
मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकालाही कोरोना विषाणूचा फटका बसण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपनीला दिलेले पुतळ्याचे काम भारतीय कंपनीला देण्याची मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे. मात्र, दोन-तीन महिन्यांत चीनमधील स्थिती सुधारली नाही तरच दुसºया पर्यायाचा विचार केला जाईल, अशी भूमिका स्मारक कामाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार मंगळवारी स्मारकाचा पाहणी दौरा झाला. खासदार राहुल शेवाळे यांच्यासह एमएमआरडीएचे अधिकारी, शिल्पकार अनिल सुतार, प्रकल्प सल्लागार शहापुरजी पालनजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे आणि अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.
स्मारकातील पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार असून, प्रत्यक्ष पुतळा बनविण्याचे काम प्रकल्प सल्लागारांनी ‘ल्यू याँग’ या चायनीज कंपनीला दिले आहे. मात्र, कोरोनामुळे चीनमधील व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे पुतळ्याच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत हे काम चिनी कंपनीऐवजी भारतीय कंपनीला देण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी केली. रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही सोमवारी अशीच मागणी केली होती.
स्मारकातील ३५० फुटांचा पुतळा हा शंभर फुटी चबुतऱ्यावर उभारला जाईल. एमएमआरडीएकडून परवानगी मिळाल्यानंतर चबुतºयाच्या कामाला सुरुवात होईल. या सर्व कामाला एक वर्षाचा अवधी आहे. चीनमधील स्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. दोन-तीन महिन्यांत स्थिती सुधारली नाही, तर दुसºया पर्यायावर काम सुरू केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. चिनी कंपनीला मोठ्या पुतळ्यांचा अनुभव आहे. जगभरातील अनेक स्मारकांचे काम या कंपनीने केले आहे. भारतात तशी कंपनी नाही. एखादी व्यक्ती आणि कंपनी यांच्या कार्यशैलीत मोठा फरक असतो, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल यांनी भारतात शिल्प घडविण्याची क्षमता असल्याचे सांगितले. सध्या आमच्या कारखान्यात १५३ फुटी शंकराच्या मूर्तीचे काम सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम मिळाल्यास महिनाभरात काम सुरू करण्याची आमची क्षमता आहे. पुतळ्याचे काम भारतीयांना मिळाल्यास इथे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शिवाय, चीनहून भारतात पुतळा आणण्याचा खर्चही वाचेल, असे सुतार यांनी सांगितले.