भूस्खलन रोखण्यासाठी आयआयटीच्या सहयोगातून होतेय काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:06 AM2021-05-24T04:06:25+5:302021-05-24T04:06:25+5:30
मुंबई : मागील वर्षी भूस्खलन झालेल्या मालाड (पूर्व) येथील जागेवर यंदा एमएमआरडीएमार्फत आयआयटीच्या सहयोगातून भूस्खलन रोखण्यासाठी काम करण्यात येत ...
मुंबई : मागील वर्षी भूस्खलन झालेल्या मालाड (पूर्व) येथील जागेवर यंदा एमएमआरडीएमार्फत आयआयटीच्या सहयोगातून भूस्खलन रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे काम जलदगतीने करण्यात येत आहे.
एमएमआरडीएमार्फत मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या विविध कामांची पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी पाहणी केली. पाहणीत मालाड येथील जागेचा समावेश होता. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी उपस्थित होते.
मालाड (पश्चिम) येथे एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येत असलेल्या समर्पित कोविड -१९ हॉस्पिटलच्या कामाची पाहणी करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी मुंबईत पुरेशा उपचार सुविधांची उपलब्धता करणे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या अनुषंगाने हे सुसज्ज समर्पित कोविड-१९ हॉस्पिटल उभारण्यात येत आहे.
एमएमआरडीएमार्फत काम सुरू असलेल्या कलानगर उड्डाणपुलाच्या मार्गिकेची पाहणीदेखील करण्यात आली. या मार्गिकेचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, जेणेकरून कलानगर जंक्शन येथील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेली कामे गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत. पावसाळ्यात लोकांची सोय होण्याच्या दृष्टीने कामे जलदगतीने करण्यात यावीत, अशा सूचना एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या.