नवीन वर्षात कोस्टल रोडच्या कामाला येणार वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:25+5:302020-12-22T04:07:25+5:30
पहिल्या बोगद्याचे काम ७ जानेवारीपासून : खाेदकामासाठी चीनचा ‘मावळा’ मदतीला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात मनुष्यबळाअभावी रखडलेल्या ...
पहिल्या बोगद्याचे काम ७ जानेवारीपासून : खाेदकामासाठी चीनचा ‘मावळा’ मदतीला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात मनुष्यबळाअभावी रखडलेल्या महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबईतील सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे (कोस्टल रोड) आतापर्यंत केवळ १७ टक्केच काम पूर्ण झाले आहे. या दिरंगाईचा फटका प्रकल्पाच्या डेडलाइनला बसला. त्यामुळे आता कोस्टल रोडचे काम वेगाने हाती घेण्यात आले असून पहिला बोगदा खोदण्याचे काम ७ जानेवारीपासून सुरू हाेईल.
या प्रकल्पांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील १०.५८ किलोमीटर रस्त्याचे काम महापालिका करणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाली. मात्र न्यायालयीन स्थगिती आणि कोरोना काळात लॉकडाऊनमुळे कोस्टल रोडचे काम लांबणीवर पडले. त्यामुळे नोव्हेंबर २०२० पर्यंत १७ टक्के काम झाले असून १,२८१ कोटी खर्च झाले आहेत.
कोस्टल रोडसाठी १७५ एकर अरबी समुद्राखालील जमिनीवर भराव टाकला असून आणखी १०२ एकर जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे तयार करण्यात येतील. हे बोगदे देशातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे ठरणार आहेत. त्यांचे काम ७ जानेवारीपासून सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
कोस्टल रोड हा पूल आणि भुयारी मार्गाद्वारे उभारण्यात येत आहे. त्यासाठी समुद्राखालून चारशे मीटरचे बोगदे तयार केले जातील. ते खोदण्यासाठी चीनमधील मशीन आणण्यात आली आहे. ३९.६ फूट असा सर्वात मोठा व्यास असलेली ही मशीन आहे. या मशीनला ‘मावळा’ असे नाव देण्यात आले आहे.
* प्रकल्पाची नवीन डेडलाइन जुलै २०२३
मुंबईकरांचा वेळ, इंधन आणि पैशांची बचत करणारा कोस्टल रोड २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे ताे रखडल्याने कामाची डेडलाइन पुढे ढकलण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च आता १२,७२१ कोटींवर पोहोचला असून जुलै २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
.......................