मरोळ कामगार रुग्णालयाच्या इमारतीचे काम जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:17 AM2019-12-18T00:17:57+5:302019-12-18T00:19:17+5:30
कामगारांचे हाल : आगीच्या दुर्घटनेला झाले एक वर्ष पूर्ण, स्टाफ क्वॉर्टर्सची अवस्था वाईट
मनोहर कुंभेजकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी (पूर्व) मरोळ येथील ३५० बेडच्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला १७ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. या आगीच्या दुर्घटनेत १४ निष्पाप नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला; तर १५४ नागरिक जखमी झाले होते. आगीच्या दुर्घटनेपूर्वी येथे सुमारे १२०० कर्मचारी कार्यरत होते. तर रुग्णालयातील स्टाफ क्वार्टर्सचीसुद्धा वाईट अवस्था झाली असून येथे सुमारे १ हजार कर्मचारी राहतात.
रुग्णालयाच्या पुनर्निर्माणाचे काम आगीच्या दुर्घटनेनंतर लवकर सुरू होणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र वर्ष झाले तरी या इमारतीवर साधी एक वीटसुद्धा चढली नसून येथील काम जैसे थे असल्याने कामगारांचे हाल होत आहेत. आगीच्या दुर्घटनेमुळे रुग्णालय एक वर्ष बंदच आहे. परिणामी येथील यंत्रणा, डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी यांना कांदिवली पूर्व येथील कामगार रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र येथील रुग्णालयात येणे हे गैरसोयीचे असल्याची कैफियत येथील कामगारांनी रुग्णालय प्रशासनाकडे अनेक वेळा मांडली होती. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील कामगारांनी केला.
अंधेरी पूर्व स्थानक तसेच मेट्रोपासून सदर रुग्णालय जवळ असल्याने मुलुंड, ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ आणि अन्य भागातील कामगारांना सोयीचे होते. मात्र गेल्या १० महिन्यांपासून सदर रुग्णालय कांदिवलीला स्थलांतरित केल्याने आम्हाला येथे येणे खूपच गैरसोयीचे आहे. परिणामी खासगी रुग्णालयातून उपचार करून घ्यावे लागत असल्याची माहिती औद्योगिक कामगारांनी दिली.
या इमारतीच्या मागील बाजूला असलेली नवीन इमारत सुमारे १ वर्षाआधीपासून तयार असून येथे किमान ओपीडी तरी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांना कांदिवली (पूर्व) कामगार रुग्णालयात कामगार वर्गाने श्रद्धांजली वाहिली.