Join us

प्रसंगी हॉटेलातही केलं काम... PSI बनून मुलानं वाढवली आई-बापाची शान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:40 PM

सुरज आज फौजदार झाला आहे. यासाठी त्याचे परिश्रम, अभ्यासातील सातत्य कामाला आले.

बालाजी अडसूळ

उस्मानाबाद/मुंबई - जिद्द,चिकाटी अन् अखंड परिश्रम करण्याचा गूण अंगी असल्यावर व्यक्ति प्रतिकूल स्थितीमध्ये यशाचा झेंडा रोवतो याचा प्रत्यय तालुक्यातील करंजकल्ला येथील सुरज भारत पवार याच्या यशकथेकडे पाहिले की येतो. त्यांने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पोलिस उपनिरीक्षक म्हणून यश मिळवले आहे. बापलेकांनी एका हॉटेलात यासाठी केलेलं 'हेल्पर ते वेटर' ही श्रमसेवाही यामुळे खऱ्या अर्थाने सार्थकी लागली आहे.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत विविध क्षेत्रात यश मिळवतात.अगदी प्रशासनातील चांगल्या 'खुर्ची' वर स्थान देणार्या केंद्रीय लोकसेवा व राज्य सरकारच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कठीण परिक्षेतही घवघवीत यश मिळवत आहेत. प्राथमीक,माध्यमीक व उच्च माध्यमिक शिक्षणात सुविधा व सामग्रीचा अभाव अशा कमकुवत पाया असतानाही अनेक युवक शहरी स्पर्धेत टिकून राहतात.

तालुक्यातील करंजकल्ला येथील सुरज भारत पवार या अतिशय प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याची यशकथा ही अशीच प्रेरणादायी आहे.जेमतेम दीड एकर कोरडवाहू जमीन असलेल्या भारत विठ्ठल पवार यांना आपल्या एकुलत्या एक सुरजच्या शिक्षणाचा भार तसा पेलावत नव्हता.यातच व्यसन अन दुष्काळ पाठीशी.घरी अगदी खायचे वांधे.

अशा स्थितीत गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुरजचा तुळजापूर येथील नवोदयमध्ये प्रवेश झाला.याठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मेहनती व हुशार अशा सुरजला तस्स पाहिलं तर इंजिनिअर व्हायचं होतं.परंतु,औरंगाबादला यासाठी काकांकडे गेले असता,इंजिनियरिंगमधील स्पर्धा दृष्टीपथात आली.यामुळे मग लोकसेवा अथवा राज्यसेवेची तयारी करूु चांगली पोस्ट मिळवण्याचा संकल्प केला. यातून औरंगाबाद येथील शिवछत्रपती महाविद्यालयात बीएस्सी सुरू केली.थर्ड एअरला असतांनाच राज्यसेवा पुर्व परिक्षा दिली.पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले, परंतु पदवीचा एक विषय बॅक राहिला. यामुळे सुरज हताश झाला.

याकाळात आर्थीक अडचण शिक्षण व अधिकारी व्हायचं स्वप्न धुळीस मिळवेल की काय अशी स्थिती समोर आली होती. महिन्याला किमान तीन ते साडेतीन हजार रूपये खर्चाची गरज भासत होती.वडिलांना ही स्थिती सांगितली.यासाठी वडीला भारत पवार यांनी कळंब येथील एका चहाच्या हॉटेलात पाच ते सहा हजार रूपये महिने पगारावर काम सुरू केले.आई मीना यांनी पायाचा त्रास असतांना मंजूरी करत यास हातभार लावला.यातून सुरजचे शिक्षण व घरखर्च भागवला जावू लागला.

मग या बळावर सुरज यांनी आई-वडीलांचे कष्ट व स्वप्न धुळीस मिळू द्यायचे नाही हा चंग बांधला. जोमाने तयारी सुरू केली. जळगाव येथील दिपस्तंभ या स्वयंसेवी संस्थेच्या परिक्षेत यश मिळवून प्रवेश मिळवला. यामुळे मोफत जेवण, क्लास व अभ्यासाची सोय झाल्याने 'दिपस्तंभ' ने सुरजच्या आयुष्यात नवा 'प्रकाश' निर्माण केला.यातून गतवर्षी मंत्रालय क्लर्कपदी वर्णी लागली. ही नोकरी करत असतांनाच जिद्दी सुरजने राज्यसेवा परिक्षा दिली. यात पुर्व, लेखी, ग्राऊंड असे यश मिळवत मंगळवारी लागलेल्या निकालात पोलिस उपनिरीक्षक पदी वर्णी लावली आहे.

प्रसंगी केले हॉटेलात काम....सुरज आज फौजदार झाला आहे. यासाठी त्याचे परिश्रम, अभ्यासातील सातत्य कामाला आले. असे असले तरी यशाचा हा पल्ला गाठण्यासाठी सुरज व त्याचे वडील भारत यांना प्रसंगी हॉटेलात काम करावे लागले आहे. औरंगाबाद येथे असतांना सुरज यांनी तेथील सिडको येथील एका नामांकित हॉटेलात हेल्पर म्हणून काम केले. यातील पैशातून शिक्षणाला हातभार लावला. हे प्रयत्न पुरेसे नसल्याने वडील भारत हे कळंब येथील सुनील मार्केट येथील एका हॉटेलात आजवर कामगार म्हणून काम करत आहेत. 

टॅग्स :एमपीएससी परीक्षाउस्मानाबादमुंबईपोलिस