मुंबई : दूरदर्शनच्या मुंबई केंद्रात विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या १४० हंगामी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. कागदोपत्री कामाचे केवळ आठ दिवस दाखवून महिनाभर काम करून घेणे, तुटपुंजा पगार आणि न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रशासनाचे धोरण याविरोधात या कामगारांनी आंदोलन पुकारले आहे.
पोस्ट प्रॉडक्शन असिस्ट, व्हिडीओ एडिटर, व्हिडीओ असिस्टंट, कॅमेरामन, कॉम्प्युटर ग्राफिक असिस्टंट, फ्लोअर असिस्टंट अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांनी दूरदर्शनच्या वरळी येथील केंद्राबाहेर आंदोलन छेडले आहे. हंगामी कर्मचाऱ्यांच्या या संपाला ‘नि:स्वार्थ’ कामगार सेनेच्या अध्यक्षा अंजली दमानिया यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. १० ते २३ वर्षांपासून विविध पदांवर हंगामी कर्मचारी काम करीत आहेत. यातील कॅमेरामन वगळता अन्य सर्व कर्मचाऱ्यांना १५ हजार ८४० इतका पगार दिला जातो. यात प्रेग्नेंसी लिव, प्रॉव्हिडंट फंड, अॅक्सिडेंट पॉलिसी या कामगारांसाठी आवश्यक सुविधाही दिल्या जात नाहीत. शिवाय, कागदोपत्री केवळ आठ दिवसांचे काम दाखवूनया कर्मचाऱ्यांना महिनाभर राबवून घेतले जाते. हंगामी कर्मचाऱ्यांना सॅलरी स्लिप, अनुभव प्रमाणपत्रही दिले जात नाही, त्यामुळे नवीन नोकरी, गृहकर्ज आदी बाबींसाठीही अडचण होत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी आज दुपारी दूरदर्शन केंद्राबाहेर आंदोलकांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. जोपर्यंत प्रसार भारतीकडून पगारवाढ झाल्याचे पत्र येत नाही, तोपर्यंत हा संप चालूच राहणार असल्याची माहिती दूरदर्शनच्या हंगामी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
टोलवाटोलवीचा कर्मचाऱ्यांचा आरोपआपल्या मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीशेखर वेम्पथी यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली होती. या वेळी त्यांनी ३० जून २०१९ पूर्वी हंगामी कर्मचाऱ्यांना निश्चित धोरण आणि पगारवाढीचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.