Join us

कोरोनाचा संसर्ग होऊनही अखंड ठेवले ज्ञानदानाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईकोरोनाकाळ शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असा एकूण शिक्षण क्षेत्रासाठीच कठीण ठरला. कोविड होऊनही अनेक शिक्षकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

कोरोनाकाळ शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असा एकूण शिक्षण क्षेत्रासाठीच कठीण ठरला. कोविड होऊनही अनेक शिक्षकांनी आपली शिकवण्याची जिद्द या काळात कायम ठेवली. मुंबईतील सांताक्रूझच्या बिल्लाबॉन्ग हाय इंटरनॅशनल स्कूल येथे मागील पाच वर्षाहून अधिक काळ नववी ते बारावीला अर्थशास्त्र शिकविणाऱ्या विजयकुमार तंद्रा या शिक्षकानेही कोविडकाळात स्वतःला विलगीकरणात ठेवूनही अध्यापनाचे काम सातत्याने चालू ठेवले. त्यांच्या या कामात त्यांच्या विद्यार्थ्यांचा मोठा आधार आणि प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया ते देत आहेत.

कोरोनाकाळात बहुतांश लोकांनी संसर्ग झाल्यानंतर त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवून काही दिवस सगळ्यांशी संपर्कात न राहणे पसंत केले. मात्र याच काळात विजयकुमार यांनी आपल्या तांत्रिक कौशल्यांचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सहज, सोपे करून देण्याचा प्रयत्न केला. कोविड संसर्ग होऊनही त्यांनी आपले ऑनलाइन अध्यापन मुख्याध्यापक निखत आझम यांच्या परवानगीने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांनी आपल्या शिकवणीसाठी अधिकाधिक उपयुक्त व्हिडिओ, पीपीटी सादरीकरण तयार केले. त्यांचा या साहित्याचाच वापर करून शिकवणीदरम्यान विद्यार्थ्यांनाच त्यांचे पेपर तयार करायला लावणे आणि ग्रुपमध्ये त्यांची तपासणी करणे असे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग त्यांनी कायम राखला.

या कठीणकाळात विद्यार्थ्यांनीही त्यांना चांगला आधार देऊन त्यांच्या सूचनांप्रमाणे एखाद्या विषयावर वर्गात वादविवाद किंवा इतर उपक्रम घ्यायला सुरुवात केली, जेथे त्यांना कमी सहभाग घेऊन जास्त तणाव जाणवणार नाही याची काळजी घेतल्याचे विजयकुमार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांना मनोरंजन कार्यक्रमांसाठीही अनेक व्यासपीठ, मोबाइल ॲप, गेम्स सुचविल्याचेही ते आनंदाने सांगतात. कोणत्याही आणि कुठ्यालाही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोविडमुळे अनेक गोष्टी थांबल्या तरी शिक्षकांना शिकविण्यापासून थांबविता आले नाही असे ते अभिमानाने सांगतात. राज्यातील अनेक शिक्षकांनी कोविडकाळात केवळ शिक्षण नाहीतर इतर ही अनेक जबाबदाऱ्या सांभाळून शैक्षणिक आघाडी सांभाळली असल्याने ते खरे कोरोनायोद्धे असल्याची प्रतिक्रिया ते देतात.