कोस्टल रोडसाठी भराव टाकण्याचे काम सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:44 AM2019-04-15T06:44:09+5:302019-04-15T06:44:33+5:30
कोस्टल रोड प्रकल्पासाठी भराव टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतरही ठेकेदाराची माणसे भराव टाकतच असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार करीत आहेत.
मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पासाठी भराव टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतरही ठेकेदाराची माणसे भराव टाकतच असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार करीत आहेत. परंतु नवीन कोणतेही काम या ठिकाणी सुरू नसल्याचा बचाव पालिका अधिकारी करीत आहेत. त्यामुळे याचिकाकर्ते आता थेट न्यायालयातच याविरोधात दाद मागणार आहेत.
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पावर डिसेंबर महिन्यात काम सुरू झाले. मात्र या प्रकल्पामुळे उपजीविका नष्ट होत असल्याचा आरोप करीत स्थानिक मच्छीमारांनी विरोध सुरू केला. त्यामुळे या प्रकल्पावरील काम काही काळ बंद करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी भराव टाकण्यास विरोध सुरूच राहिला. या प्रकरणी याचिकाकर्ती श्वेता वाघ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणीदरम्यान भराव टाकणे बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
परंतु, गुरुवारी न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही वरळी डेअरी येथे या प्रकल्पाचे काम सुरूअसल्याची तक्रार मच्छीमारांनी केली आहे. रात्री या ठिकाणी डंपर येत असल्याचा आरोपही काही मच्छीमार करीत आहेत. हा प्रकार म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याने याविरोधात न्यायालयात सोमवारी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणर आहे. गेले दोन दिवस या ठिकाणी सुरू असलेल्या भराव टाकण्याच्या कामाचे छायाचित्रही न्यायालयापुढे सादर करण्यात येईल, असे अन्य एक याचिकाकर्त्या शीतल वाघ यांनी सांगितले.
>न्यायालयाचा मनाई आदेश
कोस्टल रोड प्रकल्पावर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत भराव टाकण्याचे काम बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.
न्यायालयाने आदेश देऊनही भराव सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. न्यायालयात दाखल याचिकेवर २३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
>जुन्याच ठिकाणी काम
न्यायालयाने प्रकल्पाचे काम थांबविण्याचे आदेश दिलेले नाहीत. नवीन भराव कुठेही टाकण्यात आलेला नाही. भराव टाकलेल्या जुन्याच ठिकाणी काम सुुरू आहे. याबाबत न्यायालयात माहिती देण्यात येईल, असा बचाव पालिकेच्या अधिकाºयाने केला आहे.