मुंबई - प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दिशेने मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. यासंदर्भात इच्छुक कंपन्यांनी प्रस्ताव करण्यासाठी ४ ते १४ डिसेंबर ही मुदत आखून देण्यात आली आहे. निवड झालेली कंपनी कृत्रिम पावसासाठी आवश्यक वातावरण, वेळ, ठिकाण यांची निश्चिती करेल आणि मगच या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेला पाण्याच्या टँकरवर येत असलेला खर्च कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्यास वाचवता येणार आहे. त्यामुळे पालिका कृत्रिम पावसाची चाचपणी करेल, असे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आता त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक संशोधन, माहिती पालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र, निविदा प्रक्रियेसाठी अर्ज करणारी कंपनी ही या तंत्रज्ञानातील पारंगत अशीच असेल त्यांचीच निवड करण्यात येणार आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याचा किमान सात वर्षांचा अनुभव असावा हे निकष कंपनीच्या निवडीसाठी महत्त्वाचे असतील.
कृत्रिम पावसासाठी काय आवश्यक? कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी परिसरात आर्द्रता ७० टक्के असणे आवश्यक आहे. योग्य त्या ढगांची निवड करून त्यात ठराविक प्रकारच्या कणांचे बीजारोपण करण्यात येते. हा कण पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते. याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. उष्ण तसेच शीत ढगांसाठी कृत्रिम पावसाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. विमानाने फवारणी करणे, रॉकेटने ढगात रसायन सोडणे आणि जमिनीवर रसायनाचे ज्वलन करणे अशा तीन पद्धती वापरून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो.
पुढील तीन वर्षांसाठी कंत्राटमुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला तर प्रदूषणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आपल्याला मदतच होणार असल्याने त्यासंबंधी जाहिरात पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून काढण्यात आली आहे. निवड झालेल्या कंपनीला पुढील तीन वर्षांसाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कंत्राट दिले जाणार आहे.