अवघ्या नऊ मिनिटांत उभारण्यात आले गर्डर, लष्कराच्या जवानांचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 05:18 AM2018-01-19T05:18:17+5:302018-01-19T05:18:53+5:30
मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात कसा-याच्या दिशेला भारतीय लष्कराकडून पादचारी पूल बांधण्यात येत आहे. लष्कराच्या जवानांनी गुरुवारी या पुलाचे गर्डर अवघ्या नऊ मिनिटांत उभारले, व जवळपास अर्ध्या तासात पूल उभा करण्यात आला.
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात कसा-याच्या दिशेला भारतीय लष्कराकडून पादचारी पूल बांधण्यात येत आहे. लष्कराच्या जवानांनी गुरुवारी या पुलाचे गर्डर अवघ्या नऊ मिनिटांत उभारले, व जवळपास अर्ध्या तासात पूल उभा करण्यात आला.
मिशन पूर्ण झाल्याने जवानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. ३१ जानेवारीपर्यंत हा पूल प्रवाशांसाठी खुला करून देण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. आंबिवली स्थानकात या पुलाचे गर्डर उभारण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३ या वेळेत कल्याण ते आसनगावदरम्यान मेगाब्लॉक घेतला. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाºयांनी प्रथम ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडित केला. त्यानंतर सकाळी १०.४५ च्या दरम्यान जवानांनी क्रेनच्या मदतीने अवघ्या नऊ मिनिटांत पुलाचे गर्डर उभारले. दुपारी ३ वाजता कल्याण ते आसनगावदरम्यान रेल्वेची वाहतूक सुरू झाली.
२० नोव्हेंबरपासून या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. ३९ जवान या पुलाचे काम करत आहेत. लष्कराला रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मदत करत आहेत.
पुलाची वैशिष्ट्ये
आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाची लांबी १८.२९ मीटर, तर रुंदी ५ मीटर आहे. तसेच हा पूल २५ टन वजनाचा आहे. पुलावरील गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूंना जिने बांधण्यात येणार आहेत.