Join us

वर्क फ्राँम होम संस्कृती ठरतेय फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 6:26 PM

बहुतांश काँर्पोरेट आणि खासगी कंपन्यांचे कर्मचारी लाँकडाऊनच्या काळात घरून काम करत आहे.

 

मुंबई : बहुतांश काँर्पोरेट आणि खासगी कंपन्यांचे कर्मचारी लाँकडाऊनच्या काळात घरून काम करत आहे. ज्या कंपन्यांना असे काम करणे शक्य आहे त्यांच्यासाठी वर्क फ्राँम होम संस्कृती फायदेशीर ठरू लागली आहे. ३५ टक्के कर्मचारी आपल्या पूर्वीच्या क्षमतेने काम करत असून सुमारे २८ टक्के कर्मचा-यांची कार्यक्षमता त्यातून वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ४८ टक्के खासगी कार्यालये पुढील किमान सहा महिने वर्क फ्राँम होम याच पद्धतीने कामकाज करण्याच्या मानसिकतेत आहेत. वर भर देण्याचा निर्णय घेतल्याचे निरीक्षण आहे.

 नाईट फ्रॅन्क या सल्लागार संस्थेच्या माध्यमातून काँर्पोरेट रिअल इस्टेट सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे. हे सर्वेक्षण कार्यालयांची बदललेली कार्यपध्दती, त्यांच्या समोरील संभाव्य आव्हाने आणि त्याचा काँर्पोरेट रिअल इस्टेटवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी केले होते. घरून काम करताना २६ टक्के कर्मचारी कुचराई करत असून ११ टक्के कार्यालयांना त्याबाबतचा ठोस अंदाज मांडता आलेला नाही असेही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. संपर्क व्यवस्था, कुटुंबामुळे येणारा व्यत्यय आणि कर्मचा-यांच्या कामावरील देखरेख या वर्क फ्राँम होम संस्कृतीतल्या तीन प्रमुख अडचणी असल्याची माहिती त्यातून पुढे आली आहे.

 सोशल डिस्टंसिंगच्या निर्णयामुळे ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ वर्क फ्राँम होम संस्कृती कायम ठेवणे हे ७२ टक्के कार्यालयांना सोईस्कर वाटत आहे. तर, कर्मचा-यांना सुरक्षित प्रवास (३६ टक्के), कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टिंसिग ठेवणे (३१ टक्के), कर्मचा-यांना कार्यालयात येण्यास प्रवृत्त करणे (१६ टक्के), तर वर्क फाँम होम सतत यशस्वी ठेवणे (१६ टक्के) ही प्रमुख आव्हाने वाटत आहेत.

------------------------------

कार्यालयांसाठी जागांची मागणी वाढेल

 ६२ टक्के कार्यालये पुढील किमान १२ महिने तरी सध्याची कार्यालयांची जागा काम ठेवण्याचा किंवा सोशल डिस्टिंसिंगच्या निर्बंधामुळे त्यात वाढ करण्याच्या विचारात आहे. तर, १५ टक्के कार्यालयांच्या जागांचे क्षेत्रफळ कमी होण्याची शक्यता आहे. वर्क फ्राँम होम ही संस्कृती यापुढे काही काळ तरी सुरू राहणार असली तरी त्यामुळे कार्यालयांच्या जागा आक्रसणार नाहीत. सोशल डिस्टंसिंगच्या निर्बंधांमुळे त्या कायम राहतील किंवा वाढ होईल असे निरीक्षण या अहवालातून पुढे आल्याची माहिती नाईट फ्रँकचे अध्यक्ष शिरिश बैजल यांनी दिली.          

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या