मुंबईतील शिक्षकांना पुढील आदेशापर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:06 AM2021-03-17T04:06:37+5:302021-03-17T04:06:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ऑनलाइन, ऑफलाइन व इतर संबंधित ...

'Work from home' to Mumbai teachers till further orders | मुंबईतील शिक्षकांना पुढील आदेशापर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’

मुंबईतील शिक्षकांना पुढील आदेशापर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ऑनलाइन, ऑफलाइन व इतर संबंधित कामकाज करण्यासाठी ५० टक्के शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेत आळीपाळीने उपस्थित राहत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या आदेशानुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या शाळांच्या शिक्षकांना पुढील आदेशापर्यंत ‘वर्क फ्रॉम हाेम’ करायचे आहे. त्यानुसार शिक्षकांना १७ मार्चपासून पुढे घरी राहून इ लर्निंग शैक्षणिक सुविधांनुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवायचे आहे, अशा सूचना मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने दिल्या.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्राप्त धान्य, धान्यदायी मालाचे वितरण करण्यासाठी ज्या शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती आवश्यक असेल अशा शिक्षकांना शाळेत बाेलावण्यासंदर्भात मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा, असेही विभागाने स्पष्ट केले. तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज पडल्यास शिक्षकांना शाळेत हजर राहणे आवश्यक असल्याचेही आदेशात नमूद आहे. दरम्यान, घरून काम करताना शिक्षकांनी आपल्या उपस्थितीच्या नोंदी शालार्थ प्रणालीमध्ये प्रक्रियेनुसार नोंदविणे आवश्यक आहे.

या काळात शाळा बंद असल्या तरी शालेय परिसराची स्वच्छता आणि शालेय इमारतीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण होणे आवश्यक असल्याने शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी (लिपिक, शिपाई, हमाल) यांनी मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती यांच्या निर्देशानुसार विभागीय कार्यालय, शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात आले असले तरी मनपा कार्यालय किंवा सरकारकडून शाळेसंबंधी कोणतीही माहिती मागविल्यास ती तत्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक असेल, असे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी यासंदर्भातील पत्रातील सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे. मुंबई दक्षिण, उत्तर, पश्चिम शिक्षण निरीक्षक, खासगी प्राथमिक, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी तसेच सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळाशी संलग्नित शाळा, मुख्याध्यापकांनी महानगरपालिका शिक्षण विभागाने दिलेल्या या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

.......................

Web Title: 'Work from home' to Mumbai teachers till further orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.