वर्क फ्रॉर्म होम : मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 04:24 PM2020-05-14T16:24:24+5:302020-05-14T16:24:51+5:30
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, मुंबईकरांनी शाररिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी.
वर्क फ्रॉर्म होम : मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव करता यावा, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. संपूर्ण दिवस घरीच रहावे लागत असल्याने लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असून, मुंबईकरांनी शाररिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातून केले जात आहे.
नोकरदार मंडळी आता वर्क फ्रॉम होम करताना दिसून येत आहेत. परिणामी बैठया जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. त्यातच आता लॉकडाऊनमुळे घरीच बसून काम करावे लागत असल्याने दिवसभर एकाच जागी बसू राहिल्याने आरोग्याच्या समस्या येत आहेत. लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरी बसून काम करण्याच्या विविध पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. ऑफिसला न जाता, क्वायंट मीटिंग न करता, फिल्डवर न जाता सुद्धा अनेकांना थकवा जाणवतोय? म्हणजेच लोक एकीकडे वर्क फ्रॉम होम करण्यास यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र शारीरिक तंदुरूस्ती राखण्यात अपयशी ठरतायेत. कारण, घरी ऑफिसचे काम करताना अनेक लोक बेड, पलंग किंवा खुर्च्यांवर बसतात. अशा स्थितीत अधिक काळ बसल्याने खांदा आणि मानेवर दबाव येऊ शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
---------------------
दिवसभर एकाच जागी बसावे लागते. त्यामुळे हालचालच होत नाही आणि अपचनाचा त्रास होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, असे चक्र सुरू झाल्याने खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे अनेकांना डोकेदुखीची समस्याही जाणवू शकते. नियमित शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. पोट, पाठ आणि पायाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय मन व शरीरावरील ताणतणाव कमी करायचा असल्यास योग अतिशय फायदेशीर आहे.
- डॉ. अश्विन बोरकर, सल्लागार न्यूरोसर्जन तज्ज्ञ
---------------------
- पाठीला ताण देऊ नका
- कोणतीही वस्तू उचण्यासाठी किंवा झाडण्यासाठी पाठीवर ताण देऊ नका. यामुळे पाठदुखी होऊ शकते.
- बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळा
- शारीरिक दृष्ट्या फिट रहायचे असल्याच सतत हालचाल करणे गरजेचे आहे.
- त्यामुळे घरातून ऑफिसच काम करताना अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नका.
- स्वयंपाक घरात काम करत असतानाही वारंवार चालण्याची सवय करावी.
- फोनवर बोलतानाही बसून न बोलता फिरून बोलण्याचा प्रयत्न करावा.
- संगणकावर काम करताना खाली झुकणे हानिकारण ठरू शकते.
- यामुळे मान, मागच्या बाजूला आणि खांद्याला वेदना होऊ शकते.
- याकरता संगणकाची स्क्रीन चेह-या समोर दिसेल यासाठी त्याखाली पुस्तके लावून ती वर करा.
- त्यामुळे आपण संगणकाची स्क्रीन योग्यरित्या पाहू शकता. जेणेकरून काम करताना खाली वाकल्याने मान व मणक्याला त्रास जाणवणार नाही.
- काम करत असताना पलंगावर बसून काम करणे शक्यतो टाळावेत. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.