लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची नियुक्ती झाली असली तरी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष वगळता इतर पदाधिकाऱ्यांच्या आसनव्यवस्थेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या समित्यांच्या अध्यक्षांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे.
नसीम खान, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, डॉ. अमरजीत मनहास यांची नियुक्ती विविध महत्त्वाच्या पदांवर अध्यक्ष म्हणून झालेली आहे. हे नेते कार्यालयात भेटतील अशी कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र कार्यालय नसल्याने नेतेमंडळी घरूनच काम करीत आहेत. रेल्वे बंद असल्याने या नेत्यांपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
अंतर्गत राजकारण किंवा निष्काळजीपणा यामुळे इतर वरिष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा चुकीचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत गेेला आहे, असे मत काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.