मुंबई : लॉकडाउनमुळे सुरू झालेली ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती येत्या काळातील सोशल डिस्टन्सिंगमुळे वाढण्याची चिन्हे आहेत. या जागांचे भाडे १५ ते ३५ टक्क्यांनी कमी होईल असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. कॉर्पोरेट कार्यालयांसाठी भाडे तत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या जागा आणि को-वर्किंग जागांना त्याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता आहे.दक्षिण मुंबई आणि ‘बीकेसी’सारख्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये सध्या व्यावसायिक जागांसाठीचे मासिक भाडे (प्रती टेबल जागेसाठी) २४ हजार ते ३० हजार रुपये आहे. तर, याच भागातील को-र्वकिंग जागांचे भाडे १८ हजार ते २७ हजार रुपयांपर्यंत जाते. लॉकडाउन संपल्यानंतर ते भाडे १५ ते २० टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे. तर, लोअर परेल, अंधेरी-कुर्ला रोड यांसारख्या दुय्यम स्तरावरील बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये सध्या १२ ते १८ हजार रुपये भाडे आकारले जात असून त्यात तब्बल २५ ते ३५ टक्क्यांनी घट होण्याची चिन्हे आहे. अॅनरॉक प्रॉपर्टी या सल्लागार संस्थेने देशातील प्रमुख शहरांतील भाडे तत्त्वावरील जागांच्या भवितव्याबाबतचे एक सर्वेक्षण केले आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. पुणे, चेन्नई, हैदराबाद, नवी दिल्ली या शहरांमध्येही पुढील किमान दोन ते तीन महिने हीच परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.व्यावसायिक इमारतींची उभारणी बांधकाम व्यावसायिकांसाठी गेल्या काही वर्षांपासून किफायतशीर ठरत होती. अनेक विकासकांनी या इमारतींमधील कार्यालयांच्या जागा न विकता भाडेतत्त्वावर देण्यास प्राधान्य दिले होते. गेल्या वर्षी व्यावसायिक जागांची विक्रमी उभारणी झाली होती. मात्र, कोरोनामुळे आता त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.>आमूलाग्र बदलांची चिन्हेआयटीसह अनेक नामांकित कंपन्यांचे बहुसंख्य कर्मचारी कोरोनामुळे घरूनच काम करत आहेत. कामाच्या या नव्या संस्कृतीमुळे कंपनीच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. कर्मच्याऱ्यांचा प्रवासाचा वेळ वाचून कार्यक्षमता वाढेल. त्यामुळे येत्या काळात अनेक कंपन्यांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल अपेक्षित असल्याचे मत अॅनरॉकच्या आशुतोष लिमये यांनी व्यक्त केले.
CoronaVirus : ‘वर्क फ्रॉम होम’मुळे व्यावसायिक जागांचे भाडे कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 5:26 AM