रेल्वेचे खंडाळा घाटातील काम प्रगतीपथावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 03:32 AM2019-08-11T03:32:40+5:302019-08-11T03:38:55+5:30
मुंबई ते पुणे मार्गावर खंडाळा घाट भागात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्याने यावर मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मुंबई - मुंबई ते पुणे मार्गावर खंडाळा घाट भागात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्याने यावर मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरड भागातील प्रत्येक ठिकाणांचा आणि घटनेचा आढावा घेण्यासाठी घाट भागात ड्रोनचा वापर केला जात आहे. या ड्रोनमुळे रेल्वेच्या कामाला बळकटी मिळाली आहे.
२६ जुलैपासून खंडाळा घाटात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावरील अनेक मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या असून काही मेल, एक्स्प्रेसच्या मार्गात बदल केला आहे. शनिवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता आणि इतर रेल्वे अधिकारी कामाचा आढावा घेत होते.
जेसीबी आणि इतर अत्याधुनिक यंत्रणा वापरून रेल्वे मार्ग खुला करण्याचे काम सुरू आहे. बोगद्याचा काही भाग कोसळल्याने त्या भागाची कामे करण्यात येत आहे. स्थानकाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.