आज आमटे परिवाराच्या तिसऱ्या पिढीत दोन मुले (अनिकेत व दिगंत) डॉक्टर असून सुना गोवा व पुण्यातील आहेत. सुनांनीदेखील शहरातील भौतिक सुखाचा त्याग करून सामाजिक कार्याचे व्रत स्वीकारले आहे. आज त्यांचे शैक्षणिक कार्य दर्जेदार व स्पृहणीय आहे. नातवंडेदेखील हेमलकसा परिसरात रमले आहेत, असे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.महानिर्मितीच्या वतीने गतिमान प्रशासन मानव संसाधन या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त ‘संवाद सामाजिक ऊर्जेचा’ हा कार्यक्रम वांद्रे येथील प्रकाशगड मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची मुलाखत घेण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या.डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, निर्मिती हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. निर्मिती हीच शक्ती - ऊर्जा आहे. सामाजिक कार्यात ऊर्जा निर्माण करण्यासाठी निमित्त, संधी व संकल्प आवश्यक आहे. स्वत:शी प्रामाणिक राहिल्यास त्याचा निश्चितच परिणाम दिसून येतो. बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या संस्काराला मानवतेची ऊर्जा होती. वेगळ्या वाटेवर प्रवास करताना डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या रूपाने मला लोकबिरादरी प्रकल्पासाठी ऊर्जा लाभली.मूलभूत सुविधांपासून कोसो मैल दूर असलेल्या माडिया आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचा प्रयत्न होता. मंदाकिनी आमटे यांनी शब्द पाळला. अभावात आनंद मानून अनोळखी लोकांचे कुटुंब निर्माण केले. आम्ही बरोबरीने काम केले. साधना आमटे (सासूने) मंदाकिनी आमटे (सुनेला) ऊर्जेचा स्रोत म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या मुलांपुढेही सुनांचे कार्य अधिक स्पृहणीय - मंदाकिनी आमटे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:25 PM