लोअर परळ पुलाच्या कामासाठी २ फेब्रुवारीला ११ तासांचा मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:55 AM2019-01-31T05:55:13+5:302019-01-31T05:55:34+5:30
रात्री १० पासून सकाळी ९ वाजेपर्यंत चालणार काम; चर्चगेट ते वांद्रेदरम्यान धिम्या मार्गावरील लोकलसेवा बंद
मुंबई : लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून ते ३ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तब्बल ११ तासांच्या या मेगा ब्लॉकमध्ये लोअर परळ पुलाचे तोडकाम केले जाणार आहे.
मेगा ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावरील जलद मार्गावरील सर्व लोकल विरार, डहाणू ते दादरपर्यंत चालविण्यात येतील. चर्चगेट ते दादर यादरम्यान जलद मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. यासह सर्व धिम्या लोकल बोरीवली, भार्इंदर, विरार ते वांद्रेपर्यंत चालविण्यात येतील.
चर्चगेट ते वांद्रे यादरम्यान धिम्या मार्गावर एकही लोकल धावणार नाही. याशिवाय अनेक लोकल सेवा आणि मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल आणि मेल, एक्स्प्रेसच्या वेळेत, मार्गात बदल करण्यात आला आहे.
काम युद्धपातळीवर
लोअर परळ पुलाच्या कामासाठी सर्व प्रकारची कामे प्रत्येकाला वाटून देण्यात आली आहेत. प्रत्येक कामासाठीचे कंत्राट देण्यात आले आहे. या कामामुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता मेगाब्लॉकदरम्यान युद्धपातळीवर कामे केली जाणार आहेत. पाडकामासाठी क्रेन लावण्यात आल्या आहेत.
- सुनील कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे
शेवटची धिमी लोकल रात्री ९.३९ वाजता.
शेवटची धिमी लोकल चर्चगेट येथून रात्री ९ वा. ३९ मि. सुटेल. ही लोकल बोरीवली येथे रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी पोहोचेल.
शेवटची जलद लोकल चर्चगेट येथून रात्री ९ वाजून ४४ मिनिटांनी सुटेल. ती बोरीवली येथे रात्री ११ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
शेवटची धिमी लोकल बोरीवली येथून रात्री ८ वाजून ५६ मिनिटांनी सुटेल. ती चर्चगेट येथे रात्री १० वाजून ३ मिनिटांनी पोहोचेल.
शेवटची जलद लोकल विरार येथून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. ती चर्चगेट येथे रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी पोहोचेल.
चर्चगेट ते दादर लोकल सेवा बंद
मेगा ब्लॉकच्या काळात सर्व अप धिम्या मार्गावरील लोकल वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येतील. त्या वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरून सुटतील.
सर्व अप जलद मार्गावरील लोकल दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येतील. दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ आणि ५ वरून सुटतील.
पश्चिम रेल्वे मार्गावरील ४०४ लोकल फेऱ्यांपैकी २०५ लोकल फेºया मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी १९९ लोकल फेºया चालविण्यात येतील.
२ फेब्रुवारीला या गाड्या रद्द
मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेजर, मुंबई सेंट्रल - इंदौर दुरोन्तो एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल - राजकोट दुरोन्तो एक्स्प्रेस, अहमदाबाद - मुंबई सेंट्रल पॅसेंजर, राजकोट - मुंबई सेंट्रल दुरोन्तो एक्स्प्रेस
३ फेब्रुवारीला या गाड्या रद्द
मुंबई सेंट्रल-अहमदाबाद गुजरात एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल - वलसाड फास्ट पॅसेंजर, वलसाड - मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर, अहमदाबाद - वलसाड गुजरात क्वीन एक्स्प्रेस, इंदौर-मुंबई सेंट्रल-दुरोन्तो एक्स्प्रेस
२४ जुलै २०१८ रोजी लोअर परळ पूल वाहतुकीसह बंद करण्यात आला.
२० आॅगस्ट २०१८ रोजी पुलाचे तोडकाम करण्यास सुरुवात झाली.
डिसेंबर २०१८ मध्ये पुलाचे ६० टक्के काम पूर्ण झाले.
१ जानेवारी रोजी पाडकाम अंतिम टप्प्यात आले होते.
२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून गर्डर काढण्याचे आणि टाकण्याचे काम सुरू करण्यात येईल.
टर्मिनसमध्ये बदल
२ फेब्रुवारी रोजी मुंबई सेंट्रल - अहमदाबाद गुजरात मेल दादर येथून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल. मुंबई सेंट्रल - वडोदरा एक्स्प्रेस दादर येथून रात्री ११.५० ला सुटेल.
३ फेब्रुवारी रोजी मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद पॅसेंजर बोरीवली येथून दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. मुंबई सेंट्रल - फिरोजपूर जनता एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवरून सकाळी ७.२५ ऐवजी ९ वाजता सुटेल. मुंबई सेंट्रल - पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवरून सकाळी ८ वाजून २० मिनिटांऐवजी ९.२० ला सुटेल.
असे होईल काम : २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून लोअर परळच्या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. यामध्ये संपूर्ण पूल जमीनदोस्त केला जाईल. यावेळी पुलाखालील अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरील ओव्हरहेड वायरमधील (ओएचई) वीज पुरवठा खंडित करून ओएचई खाली आणल्या जातील. ओएचई बाधित न होता काही तासांमध्ये पुलाच्या कामाचे ढीग इतरत्र हटविण्याचे आव्हान असणार आहे. पुलाचा सांगडा संपूर्ण काढून येथील गर्डर काढण्याचे आणि टाकण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल. पाडकाम ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत केले जाईल. या पुलाचे संपूर्ण काम ११ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये होणे शक्य नसल्याने पुन्हा जादा कालावधीचा मेगाब्लॉक घेण्याची शक्यता आहे.