Join us

मेट्रो-३ चे काम रात्री करण्यास १० आॅगस्टपर्यंत स्थगिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 6:01 AM

दक्षिण मुंबईतील कफ परेड येथे रात्री १०नंतर मेट्रो-३चे काम करण्यास दिलेली स्थगिती हटविण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

मुंबई : दक्षिण मुंबईतील कफ परेड येथे रात्री १०नंतर मेट्रो-३चे काम करण्यास दिलेली स्थगिती हटविण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. १० आॅगस्टपर्यंत ही स्थगिती कायम ठेवत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) कफ परेड येथे मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या आवाजाचे मोजमाप करून त्याचा अहवाल ८ आॅगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले.कफ परेड येथील रहिवासी रॉबिन जयसिंगानी यांनी मेट्रो-३च्या कामामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने मेट्रो-३चे रात्री १०नंतर काम करण्यास स्थगिती दिली. ही स्थगिती हटविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल)ने उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती.शुक्रवारच्या सुनावणीत न्यायालयाने एमएमआरसीएलला अंतरिम दिलासा देण्यास नकार देत ही स्थगिती १० आॅगस्टपर्यंत कायम ठेवली. ‘कफ परेड येथे मेट्रोच्या कामामुळे होणाºया आवाजाचे मोजमाप करून एमपीसीबीने ८ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करावा. तसेच राज्य सरकार, एमएमआरसीएल आणि कंत्राटदारांनी यावर तोडगा काढावा,’ असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १० आॅगस्ट रोजी ठेवली.

टॅग्स :मेट्रो