मेट्रो-७च्या कामाला आजपासून सुरुवात
By admin | Published: August 8, 2016 05:35 AM2016-08-08T05:35:21+5:302016-08-08T05:35:21+5:30
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ मार्गाच्या कामाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ मार्गाच्या कामाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सोमवारपासून या मार्गावरील तीन ठिकाणी बॅरिकेडिंगच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले आहे.
मेट्रो-७च्या बॅरिकेडिंगचे काम तीन भागांत विभागण्यात आले आहे. पहिल्या भागात हब मॉल ते आरे फ्लायओव्हरचा समावेश असून, हे काम सिम्पलेक्सला देण्यात आले आहे. दुसऱ्या भागात पठाणवाडी ते पुष्पा पार्कचा समावेश असून, हे काम जे. कुमारला देण्यात आले आहे. तिसऱ्या भागात मेट्रो मॉल ते देवीपाड्याचा समावेश असून, हे काम एनसीसीला देण्यात आले आहे. हे काम पुढील १०-१२ दिवस सुरू राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी यासंदर्भात सांगितले की, मेट्रो-७च्या कामासाठी मुंबईकरांनी सहकार्य केले तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर मुंबईकरांचा वेळ आणि इंधन वाचेल. (प्रतिनिधी)