Join us

म्हाडाच्या बांधकाम चाचणी प्रयोगशाळेचे कामकाज आजपासून ऑनलाईन  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 5:21 PM

म्हाडाच्या दक्षता व गुणनियंत्रण कक्षांतर्गत  कार्यरत साहित्य चाचणी प्रयोगशाळेमध्ये म्हाडाची विविध मंडळे , विभाग तसेच अनेक शासकीय व खाजगी संस्था विविध प्रकारच्या चाचण्या नियमितपणे करवून घेत आहेत.

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी म्हाडाच्या बांधकाम चाचणी प्रयोगशाळेतील सर्व कामकाज पारदर्शक प्रशासनाच्या कक्षेत आणत, प्रयोगशाळेच्या कामकाजाकरिता विशेष ऑनलाईन आज्ञावलीचे आज उद्घाटन केले. म्हाडाच्या बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेमार्फत होणारी सर्व कामे जसे नोंदणीकरण, चाचण्यांचे शुल्क, बांधकाम साहित्य चाचण्यांचे अहवाल इत्यादी सर्व कामे ऑनलाईन आज्ञावलीद्वारे कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहेत.  

"म्हाडाच्या बांधकाम चाचणी प्रयोगशाळेतील ग्राहकांना गुणवत्ता पूर्वक सेवा पुरविणारी ही आज्ञावली म्हणजे म्हाडाच्या पारदर्शक कारभारात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवीन आर्थिक वर्षांपासून सुरु करण्यात आलेली,  ऑनलाईन कार्यप्रणाली प्रयोगशाळेच्या कामकाजात सुसुत्रीपणा नक्कीच आणेल," असे मत म्हैसकर याप्रसंगी व्यक्त केले. म्हाडा मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत मुख्य अभियंता धीरज पंदिरकर, वित्त नियंत्रक विकास देसाई, उपमुख्य अभियंता राजेंद्र गळदगेकर,  मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, कार्यकारी अभियंता किशोर काटवटे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते. 

म्हाडाच्या दक्षता व गुणनियंत्रण कक्षांतर्गत  कार्यरत साहित्य चाचणी प्रयोगशाळेमध्ये म्हाडाची विविध मंडळे , विभाग तसेच अनेक शासकीय व खाजगी संस्था विविध प्रकारच्या चाचण्या नियमितपणे करवून घेत आहेत. या सर्व संस्था /कंत्राटदार,  म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mhada.gov.in वरील citizen corner मधील material testing laboratory या टॅब वरून  log in करू शकतील तसेच https://mtl.mhada.gov.in या url वरून log in करू शकतील. ग्राहकांकरिता २४*७ ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या संगणकीय प्रणालीमध्ये ग्राहकाची एकदा नोंदणी झाल्यास कायमस्वरूपी डेटा संकेतस्थळावर तयार होणार आहे. ज्यामुळे संबंधित ग्राहकास पुन्हा बांधकाम साहित्यांची चाचणी करावयाची झाल्यास केवळ कामाच्या स्वरूपाची नोंद करावी लागेल. अशाप्रकारे ही कार्यप्रणाली युझर फ्रेंडली, वेळेचे बचत करणारी आणि महत्वाचे म्हणजे कागद विरहित प्रशासनास भर घालणारी ठरणार आहे. तसेच साहित्य चाचण्यांकरिता आकारण्यात येणारे शुल्क भरणा व त्यांची पोचपावती ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहे.

 या प्रणालीमुळे ग्राहकाचा जीएसटी भरण्याबाबतचा तिढा देखील सुटणार आहे. ग्राहकांना या नवीन आज्ञावलीचा सराव होणेच्या दृष्टीने एक महिन्याच्या कालावधीकरिता ऑनलाईन व ऑफलाईन शुल्क अदायगीचा विकल्प ग्राहकांना उपलब्ध करवून देण्यात आला आहे. साहित्य चाचणी करण्यासाठीचे संबंधित विभागाचे पत्र व बांधकाम साहित्य नमुने प्रयोगशाळेत स्वीकारण्यात येतील. संबंधित अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या असलेले साहित्य चाचणी अहवाल संस्थांना / विभागांना ई-मेल द्वारे थेट पाठविण्यात येणार आहेत.  

टॅग्स :म्हाडा