मिठी नदीवरील पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:22+5:302021-07-16T04:06:22+5:30
मुंबई : कुर्ला येथील मिठी नदीवर पूल बांधण्याचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण करण्याआधीच ...
मुंबई : कुर्ला येथील मिठी नदीवर पूल बांधण्याचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण करण्याआधीच महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी महापालिकेने आतापर्यंत संबंधित ठेकेदाराला १६ कोटी रुपये दिले आहेत, तर पुढील कामासाठी एमएमआरडीएला ५१ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
मुसळधार पावसात रौद्र रूप धारण करणाऱ्या मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. त्यानंतर येथील जुने पूल पाडून त्या ठिकाणी पालिका नवे पूल बांधत आहे. कुर्ला येथील सीएसटी मार्गावरील पूल बांधण्यासाठी पालिकेने सन २०१७मध्ये कार्यादेश दिले होते. या पुलाच्या बांधकामासाठी पालिका ५९ कोटी रुपये खर्च करणार होती. प्रत्यक्षात ठेकेदाराने पुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८मध्ये सुरू केले. मात्र, अद्याप हा पूल तयार झालेला नाही.
सन २०१७मध्ये अध्यादेश दिल्यानंतर मे २०१९पर्यंत पूल तयार होणे गरजेचे होते. मात्र, अद्याप या पुलाचे काम रखडले असल्याने आता याची जबाबदारी एमएमआरडीएकडे सोपविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, पुलाचे काम रखडल्यामुळे त्याच्या खर्चातही आता वाढ होणार आहे.
ठेकेदारावर कारवाई नाही
मागील तीन वर्षे या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अपेक्षित खर्चापेक्षा अधिक रक्कम म्हणजे दहा कोटी रुपये पालिका प्रशासन खर्च करीत आहे. तर, पुलाचे रुंदीकरण रखडल्याने वाहतूक कोंडीही या भागात मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, या पुलाच्या विलंबासह त्यावर होणाऱ्या वाढीव खर्चावर भाजपने आक्षेप घेतला आहे. ठेकेदार कामचुकारपणा करीत असताना त्याच्यावर कोणती कारवाई पालिकेने केली आहे? तसेच काम झाले नाही, तर १६ कोटी रुपये कशासाठी दिले? असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत उपस्थित केला.
नेहमीच वाहतूक कोंडी
कुर्ला कलिना मार्गावरील ६० मीटर रुंद आणि ७५० मीटर लांबीचा हा पूल आहे. नवा पूल शंभर मीटर लांबीचा बांधण्यात येणार होता. चेंबूर - सांताक्रुझ जोड रस्ता या मार्गावरून जातो. सध्याचा पूल अरुंद असल्याने येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते.