मुंबई : मुंबई महापालिका नागरी सेवासुविधांच्या कामकाजावर अधिकाधिक भर देत असतानाच, हरित लवादाच्या स्थगितीमुळे महापालिकेने हाती घेतलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्यता आहे. महापालिकेने मुंबईमधील सहा मलजल प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी कंत्राटदार नेमता यावेत, यासाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, हरित लवादाने पर्यावरण मंत्रालयाच्या निकषांनाच स्थगिती दिली आहे. परिणामी, ही प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.
शहर-उपनगरात मलजलावर प्रक्रिया न करता ते समुद्रात सोडले जाते. परिणामी, समुद्र मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होतो. या कारणास्तव पालिकेने मलनिस्सारण प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पात मल वाहून नेत असलेल्या वाहिन्यांचे जाळे बळकट करणे आणि मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे याचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करतानाच कुलाबा, वरळी, वांद्रे, घाटकोपर, वर्सोवा, भांडुप, मालाड येथे मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. कुलाबा, मालाड येथील कामे काही अंशी सुरू होत असतानाच, भांडुप, घाटकोपर, वर्सोवा, वांद्रे आणि वरळी येथे मलजल प्रक्रिया केंद्राच्या उभारणीसाठी निविदा मागविण्यात आल्या. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच, पर्यावरण मंत्रालयाच्या निकषांनाच स्थगिती देण्यात आल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.प्रक्रिया खोळंबणारहरित लवादाकडे या संदर्भात जी याचिका दाखल करण्यात आली आहे, त्या याचिकेनुसार, पर्यावरण मंत्रालयाच्या निकषानुसार मलजलावर करण्यात येत असलेल्या प्रक्रियेअंती समुद्रात जे पाणी सोडण्यात येते, त्या पाण्याद्वारे समुद्रातील प्रदूषण रोखणे कठीण आहे. या प्रकरणात लवादाने पर्यावरण मंत्रालयाच्या निकषांनाच स्थगिती दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या निकषांनुसारच ही केंद्रे उभारण्यात येणार होती. मात्र, आता स्थगिती देण्यात आल्याने प्रक्रिया केंद्रांची कामे रखडण्याची शक्यता आहे.