कामकाज मराठीतूनच झाले पाहिजे

By admin | Published: May 18, 2017 03:41 AM2017-05-18T03:41:35+5:302017-05-18T03:41:35+5:30

मुंबई महापालिकेचे कामकाज शंभर टक्के मराठीतून करण्याची कायद्यातच तरतूद आहे. मात्र, याचा विसर अधिकाऱ्यांना पडत असल्याने प्रशासन दरवर्षी परिपत्रक काढून

Work must be done from Marathi itself | कामकाज मराठीतूनच झाले पाहिजे

कामकाज मराठीतूनच झाले पाहिजे

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेचे कामकाज शंभर टक्के मराठीतून करण्याची कायद्यातच तरतूद आहे. मात्र, याचा विसर अधिकाऱ्यांना पडत असल्याने प्रशासन दरवर्षी परिपत्रक काढून याचे स्मरण त्यांना करून देत आहे. थोडा काळ लोटताच अधिकारी पुन्हा इंग्रजीच वापरत असल्याची गंभीर दखल आयुक्त अजय मेहता यांनी घेतली आहे. त्यानुसार पालिकेचे कामकाज शंभर टक्के मराठीतून होईल, याची खबरदारी घेण्याची सक्त ताकीद आयुक्तांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना दिली आहे.
महापालिकेचे कामकाज मराठीतून करण्याचा कायदा २९ जुलै १९७१मध्ये करण्यात आला. कालांतराने या कायद्याचा विसर पडून अधिकाऱ्यांनी इंग्रजीतूनच कारभार चालवण्यास सुरुवात केली. या कायद्याचे स्मरण करून देत, तसा ठरावच पालिका महासभेत काही वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला. त्यानंतर अनेक वेळा वैधानिक समितीच्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांच्या इंग्रजी भाषेतील सादरीकरणावर आक्षेप घेत मराठीचाच आग्रह वेळोवेळी नगरसेवकांनी धरला. मात्र, अधिकारीवर्ग या कायद्याला जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. अधूनमधून इंग्रजी शब्द पालिकेच्या कारभारात डोकावू लागतात.
यावर पालिका महासभेत आवाज उठताच प्रशासनामार्फत परिपत्रक काढून कामकाज शंभर टक्के मराठीतूनच, याची अधिकाऱ्यांना आठवण करून देण्यात येते. मात्र, अशा परिपत्रकांचा फारसा परिणाम होत नसल्याची जाणीव आता प्रशासनाला झाली आहे. त्यामुळे ९ मे २०१७ रोजी पुन्हा परिपत्रक काढून हा नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचीही कायद्यात तरतूद असल्याचा इशारा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अमराठी अधिकाऱ्यांनाही कारवाई टाळण्यासाठी पालिकेच्या कामकाजात मराठी भाषा गोड मानून काम करावे लागणार आहे.

दिव्याखाली अंधार
महापालिकेच्या कामकाजात मराठीचा शंभर टक्के वापर हा कायदा पाच दशकांपूर्वीच तयार झाला आहे. मात्र, पालिकेचे अधिकारीच हा नियम वारंवार मोडत आहेत. काही इंग्रजी शब्दांना मराठीत क्लिष्ट व अवघड शब्द आहेत. काहींचे अर्थच सापडत नाहीत. असा युक्तिवाद मांडत अधिकारी मराठी भाषेचा वापर कामकाजात करण्यास टाळाटाळ करीत असतात. याची कबुली पालिका प्रशासनानेच दिली आहे.

झाडाझडती सुरू
जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभरातील सर्व अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा आयुक्तांनी मागवला आहे. त्यानुसार पालिकेच्या कामकाजात मराठीचा वापर करण्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादीच तयार करण्यात येणार आहे. तसेच या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी काय कारवाई केली? याचा जाबही विभाग अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे.

विभाग अधिकाऱ्यांना ताकीद
आयुक्त अजय मेहता यांनी याची गंभीर दखल घेत, विभाग अधिकाऱ्यांना सर्व काम मराठीतून झालेच पाहिजे, असे ठणकावले आहे. तसेच आपल्या विभागात सर्व कर्मचारी मराठीतूनच काम करतील, याची खबरदारी घेण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महापालिकेने जून २००८ पासून
१०० टक्के कामकाज मराठीतून करण्याची घोषणा पुन्हा केली़. त्याुसार पालिकेतील विविध समित्या, महासभेच्या सर्व बैठकांच्या कार्यक्रमपत्रिका, पालिकेचे विविध अर्ज, नागरी सुविधा केंद्र आदी येथे मराठीतून कामकाज सुरू झाले़ मात्र, मराठी भाषांतर कठीण होत असल्याने अनेक कामचुकार विभागांमध्ये अजूनही मराठीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत़

Web Title: Work must be done from Marathi itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.