लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या नायगाव उड्डाणपुलाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले आहे. रखडलेल्या नायगाव उड्डाणपुलाचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण होण्यासाठी एमएमआरडीएतर्फे कंत्राटदाराला मुदतवाढ दिली गेली आहे.
२० डिसेंबर २०१३ रोजी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. २० जून २०१६ रोजी काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. १.२९ किलोमीटरचा नायगाव उड्डाणपूल असून, ८५.१२ कोटी अपेक्षित खर्च आहे. अजूनपर्यंत खर्चात वाढ झाली नाही. ५ वर्षे ११ दिवस अशी एकूण दिलेली मुदतवाढ आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
नायगाव उड्डाणपुलांमुळे प्रामुख्याने नायगाव पश्चिम, नायगाव पूर्व व वसई तालुक्यातील उमेळे, ज्यूचंद्र, आदी भागांत फायदा होईल. वसई पश्चिम व उमेळे गावातील स्थानिकांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ पर्यंत अंदाजे १० किलोमीटर अंतर कमी होऊन वळसा वाचेल.