मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा सुधारणेसाठी हाती घेण्यात आलेल्या अमरमहाल ते परळ या सुमारे ९.८ किलोमीटर लांब अंतराच्या भूमिगत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमरमहाल ते वडाळा आणि वडाळा ते परळ अशा दोन टप्प्यात खनन करण्यात येत आहे. पैकी अमरमहाल ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे खनन १४ महिन्यांच्या नियोजित कालावधीच्या ४ महिने आधीच म्हणजे अवघ्या १० महिन्यांमध्ये पूर्ण करुन महानगरपालिकेने विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. या कामगिरीमुळे प्रकल्पाचा वेग वाढणार असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आठवड्यावर येवून ठेपला असताना ही विक्रमी कामगिरी अभियांत्रिकी क्षेत्राच्या दृष्टीने कौतुकास्पद ठरली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत अमरमहल ते वडाळा व पुढे वडाळा ते परळ हा एकूण ९.८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा बांधण्याचा प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. जल बोगदा खनन करण्यासाठी बोगदा खनन संयंत्र (टीबीएम) देखील कार्यरत आहे. प्रकल्पातील बोगदा खनन दोन टप्प्यात विभागण्यात आले आहे. पैकी पहिल्या टप्प्यातील हेडगेवार उद्यान (अमरमहाल) ते प्रतीक्षा नगर (वडाळा) दरम्यानच्या सुमारे ४.३ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खनन दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु करण्यात आले होते. सुमारे १४ महिने कालावधीत म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते.
असे असले तरी पाणीपुरवठा सुधारणेची गरज नजरेसमोर ठेवून, कोविड संसर्ग परिस्थिती आणि इतर सर्व आव्हानांवर मात करीत हे खनन वेगाने सुरु ठेवण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. अजय राठोर, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) श्री. वसंत गायकवाड व त्यांच्या सहकारी अधिकाऱयांनी पहिल्या टप्प्यातील खनन काम वेगाने पूर्णत्वास नेले. त्यामुळे सुमारे १४ महिने अंदाजित कालावधीच्या तुलनेत ४ महिने आधीच म्हणजे अवघ्या दहा महिन्याच्या विक्रमी कालावधीत आज (दिनांक ८ ऑगस्ट २०२२) खनन पूर्ण झाले आहे. खनन पूर्ण होवून बोगदा खनन संयंत्र बाहेर पडले, त्याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. अजय राठोर, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) श्री. वसंत गायकवाड व सहकारी अधिकारी तसेच प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स, प्रकल्पाचे बांधकाम कंत्राटदार मेसर्स सोमा इंटरप्राईज लिमिटेड यांचे अधिकारी, कर्मचारी पथक देखील उपस्थित होते.
- दरम्यान वडाळा ते परळ या दुसऱया टप्प्यातील भूमिगत जलबोगद्याचे खनन दीड महिन्यानंतर सुरु होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण करुन बाहेर पडलेले बोगदा खनन संयंत्र सुमारे ८ अंशात फिरवून दुसऱया टप्प्यातील कामास प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल.- अमरमहाल ते परळ हा संपूर्ण प्रकल्प विचारात घेता आजपर्यंत त्याचे ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजित वेळेत म्हणजेच एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईल, याची महानगरपालिका प्रशासनाला खात्री आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये १) सदर जलबोगद्याद्वारे एफ/उत्तर, एफ/दक्षिण त्याचप्रमाणे ई आणि एल विभागातील काही परिसरातील नागरिकांना सन २०६१ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. २) हा जलबोगदा सुमारे १०० ते ११० मीटर इतक्या खोलीवर असून त्याचा व्यास सुमारे ३.२ मीटर इतका आहे. ३) या प्रकल्प अंतर्गत तीन कूपकांचे (shafts) बांधकाम समाविष्ट आहे. हेडगेवार उद्यान येथील ११० मीटर व प्रतीक्षा नगर येथील १०४ मीटर खोलीच्या दोन कूपकांचे काम पूर्ण झाले आहे. तर परळ येथील १०१ मीटर खोलीच्या कूपकाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. ४) पहिल्या टप्प्यातील जलबोगद्याच्या बांधकामादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक नवे विक्रम केले आहेत. यामध्ये- अ) हेडगेवार उद्यान येथील ९६.१५ मीटर खोलीच्या कूपकाच्या आरसीसी अस्तरीकरणाचे काम फक्त २९ दिवसात पूर्ण केले. ब) एका महिन्यात ६०५ मीटर लांबीच्या जलबोगद्याचे विक्रमी खोदकाम जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण केले. क) विविध अडचणींना तोंड देत एका दिवसात सर्वोच्च अशा ३४.५ मीटर लांबीचे जल बोगद्याचे खोदकाम करण्यात यश आले.