- रोहित नाईकमुंबई : शरीरसौष्ठव खेळाचा वेगळा चाहतावर्ग आहे. भारत श्री, महाराष्ट्र श्री, मुंबई श्री अशा अनेक नावाजलेल्या स्पर्धांमधून दररोज गुणवान शरीरसौष्ठवपटूंचे कौशल्य पाहण्यास मिळते. परंतु, बोरिवली येथे चक्क ७० वर्षांचा शरीरसौष्ठव आपल्या पीळदार शरीरयष्टीने सर्वांना प्रभावित करत आहे. उमेश कांचन असे नाव असलेल्या या दमदार शरीरसौष्ठवाचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.
बोरिवली पूर्वेकडील हनुमान टेकडी परिसरातील श्री समर्थ जिम्नॅशियम अँड फिटनेस सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री समर्थ श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत उमेश यांनी सर्वांनाच चकीत केले. वय वर्ष ७० असले, तरी त्यांचा उत्साह आणि त्यांचे शरीरयष्टी सादरीकरणाचे कौशल्य अप्रतिम ठरले. उमेश यांनी आपल्या उमेदीच्या काळात वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग खेळांमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या.
बँक कर्मचारी म्हणून ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरासह विविध स्तरांमध्ये अनेक पदकांची कमाई केली. यानंतर त्यांनी हळूहळू शरीरसौष्ठवमध्येही सहभाग घेण्यास सुरुवात केली. मूळचे कर्नाटकमधील उडुपी येथील असलेले उमेश यांनी वयाच्या १८-१९ वर्षांपासून वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंगमध्ये पदार्पण केल्यानंतर सलग ५० वर्ष विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे.
योगा आणि व्यायाम
दररोजचा योगा आणि व्यायाम आपल्या सुदृढ आरोग्याचे रहस्य असल्याचे उमेश कांचन सांगतात. व्यायामशाळेत ‘अंकल’ म्हणून ओळखले जाणारे उमेश दररोज पहाटे शीर्षासन, बालासन, वज्रासन असे अनेक योगासने केल्यानंतर संध्याकाळी ५ वाजल्यापासून दोन तास कसून व्यायाम करतात. उमेश सांगतात की, ‘तरुणांनी शारीरिक तंदुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. खेळ किंवा पदकासाठी नाही, तर आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मी जन्मापासून कधीही कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात गेलेलो नाही. या वयात स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे उत्साह संचारतो.’
त्यांच्यामुळे मिळतात शिस्तीचे धडे
उमेश अंकल जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहे. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि वेळेचे पालन करणारे आहेत. त्यांच्याकडून आम्ही शिस्तीचे धडे घेतो. कोणत्याही कामामध्ये एकाग्रता कशी असावी, हे त्यांच्याकडून शिकण्यास मिळते. त्यांचा उत्साह सर्वांनाच प्रेरित करणार आहे.-रोहित पाटेकर, जिम ट्रेनर