मेट्रो ९ चे रात्रीच्या वेळी पूर्ण केले काम
By सचिन लुंगसे | Published: July 29, 2023 06:54 PM2023-07-29T18:54:44+5:302023-07-29T18:55:09+5:30
रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ९ मधल्या सिल्व्हर पार्क, भाईंदर येथे उच्चदाब विद्युत प्रहाव वाहिनी लगतच्या १.५ किमी भागातील मेट्रो वायाडक्ट उभारणीसाठीचे एलिमेंट्स उभारून एमएमआरडीएने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. २२ ते २७ जुलै या कालावधीत मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
क्रेनवर सुरक्षित नियंत्रण आणि कामगारांचे संरक्षण सुनिश्चित करून हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याने या मार्गालगतचा विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यात आला. या भागातील २२० केव्हीच्या उच्चदाब विद्युत वाहिन्या राज्य भार प्रेषण केंद्र आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांच्या देखरेखीखाली विद्युतपुरवठा नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले.
मेट्रो टीमने या भागातील यु आणि आय आकारातील व्हायाडक्ट एलिमेंट्स आणि टी , एल गर्डर्स, प्लॅटफॉर्म पिअर कॅप आणि काँकोर्स पिअर कॅपसारखे स्टेशन एलिमेंट्स यशस्वीरित्या उभारले. या भागांच्या उभारणी सोबत मेट्रो लाईन ९ च्या स्थानकांमध्ये जवळपास ९० टक्के प्रमुख घटकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.
मुसळधार पाऊस, वाऱ्याचा प्रवाह यासारख्या आव्हानात्मक हवामान परिस्थिती तसेच मर्यादित जागा असूनही एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने सुरक्षेच्या उपायांना प्राधान्य दिले. तसेच, घरगुती विद्युत पुरवठ्यात खंड न पडू देता योजनेप्रमाणे ठराविक कालमर्यादेत उभारणीची प्रक्रिया पूर्ण केली. मेट्रो टीमच्या अथक प्रयत्न आणि परिश्रम करून हे काम पूर्ण झाले. उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात आला.
मुंबई उपनगरांना मीरा-भाईंदर शहराला जोडणाऱ्या ८ स्थानके असलेल्या १०.५८ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग ९ चे बांधकाम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. मेट्रो मार्ग ९ हा मेट्रो मार्ग ७ चा उत्तरेकडील विस्तार आहे. ही मार्गिका इतर मेट्रो कॉरिडॉरपेक्षा वेगळी आहे. कारण या मेट्रो मर्गिकेमध्ये दोन अंतरबदल मेट्रो स्थानकांसोबत आणि रस्ते वाहतुकीसाठी एकात्मिक फ्लायओव्हर सुध्दा आहेत.
एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने मेट्रो मार्ग ९ मधील कठीण आणि महत्त्वपूर्ण उभारणीचा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून उल्लेखनीय काम केले आहे. प्रतिकूल हवामान असतानाही, मेट्रो मार्ग वेळेवर पूर्ण होण्यासाठी मेट्रोची संपूर्ण टीम अथक परिश्रम करत आहे. हा उपक्रम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी विद्युत पुरवठा नियंत्रित करणे आवश्यक होते. विशेषत: घोडबंदर वर्सोवा आणि घोडबंदर गोराईला वीज पुरवठा करणार्या महत्त्वाची उच्चदाब विद्युत प्रवाह वहिनी असल्याने हे काम कठीण होते, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.