मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील काम विविध कारणांमुळे रखडले होते. मात्र, या सुमारे ८५ किमी रस्त्याचे कामही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. या रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम मे २०२३ अखेर तर दुसऱ्या मार्गिकेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होईल. हे चौपदरीकरण डिसेंबरअखेर पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी परिषदेत दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री चव्हाण म्हणाले की, मागील दहा वर्षे हे काम सुरू आहे. यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीत असलेल्या अडचणी दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. १५५६ दाव्यांपैकी सर्व दावे निकाली काढून पैसे देण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यामुळे आता भूसंपादनामुळे हे काम रखडणार नाही. पनवेल ते कासू रस्त्यासाठी १५१ कोटी, तर कासू ते इंदापूर रस्त्यासाठी ३३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामासाठी दोन वेगवेगळ्या संस्था नियुक्त केल्या असून, त्यांच्यामार्फत काम सुरू आहे. ड्रोनच्या माध्यमातून कामाची माहिती घेतली जात आहे.