मुंबई : एसटी नेमकी कुठे आहे? स्टॉपवर कधी येणार? इत्यादी माहिती प्रवाशांना सहज मिळावी म्हणून एसटी महामंडळाने २०१७ मध्ये मेसर्स रोझमार्टा कंपनीला व्हीटीएस आणि पीआयएस या प्रकल्पाचे सुमारे ३४ कोटींचे कंत्राट दिले होते. मात्र २०२४ उजाडले तरी हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. तर प्रकल्प अपूर्ण असतानाही या कंपनीला २० कोटी रुपये देण्यात आले.
रोझमार्टा कंपनीला दिलेल्या कामात, बसवर व्हीटीएस उपकरण बसवणे, एसटी स्टँडवर एलईडी स्क्रीन बसवणे, एसटी बसचे ठिकाण समजण्यासाठी एमएसआरटीसी ॲप विकसित करणे आदींचा समावेश होेता. तसेच ॲपमध्ये आरक्षण, बस मार्ग, मार्गस्थ बस, मदत इत्यादी सुविधा देणे अपेक्षित होते. मात्र कंपनीने बसवलेली उपकरणे निकृष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कंपनीने विकसित केलेल्या एमएसआरटीसी ॲपमध्ये वर उल्लेखित बहुसंख्य सुविधा प्रवाशांना मिळत नाहीत. महामंडळाच्या प्रत्येक विभागातील बसवर बसवलेली ४० व्हीटीएस उपकरणे बंद आहेत. एसटी स्टँडवर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर काहीही दिसत नाही. कंपनीने केलेले काम निकृष्ट असूनही एसटी प्रशासनाने कंपनीवर दंडात्मक कारवाई केलेली नाही.
व्हीटीएस उपकरणे बंद
सातारा विभागातील ६७५ बसपैकी २६५ बसवरील व्हीटीएस उपकरणे बंद
सातारा विभागातील २४ बसस्थानकांवर पीआयएस कार्यप्रणाली बसवण्यात आली आहे. त्यापैकी ११ बसस्थानकांवरील पीआयएस कार्यप्रणाली बंद आहे.
राज्यात सर्वसाधारणपणे प्रत्येक विभागात थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. एसटी महामंडळाने मात्र कानाडोळा केला आहे.
प्रवाशांची फसवणूक ४ वर्षांपासून बंद असलेली जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली कधी सुरू होणार, असा सवाल प्रवासी करत आहेत. व्हेईकल ट्रॅकिंग प्रणालीमुळे एसटी नेमकी कुठे आहे, याची माहिती मिळते, असा एसटीचा दावा आहे. मात्र याबाबत प्रवासी मात्र अनभिज्ञ आहे. मार्च २०२० पर्यंत ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमध्ये आलेल्या शिथिलतेनंतर या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली, पण ते पूर्ण झाले नाही.
नियंत्रण कक्ष...
एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. येथून राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवता येते.