प्रभादेवीत लवकरच दुमजली पुलाचे काम, जुना पूल पाडण्याची कार्यवाही सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:12 IST2025-01-22T11:12:23+5:302025-01-22T11:12:43+5:30
Mumbai News: अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील प्रभादेवी रेल्वे मार्गावरील दुमजली पुलाचा आराखडा तयार झाला आहे.

प्रभादेवीत लवकरच दुमजली पुलाचे काम, जुना पूल पाडण्याची कार्यवाही सुरू होणार
मुंबई - अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील प्रभादेवी रेल्वे मार्गावरील दुमजली पुलाचा आराखडा तयार झाला असून, वाहतूक पोलिसांची परवानगी मिळताच सध्याचा पूल पाडून तेथे नवीन पूल उभारणीला सुरुवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रे दिशेला जाता यावे, यासाठी हा उन्नत मार्ग एमएमआरडीएकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०२१मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळी ठरल्यानुसार जानेवारी २०२४पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्याने त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. सद्यस्थितीत या मार्गाचे केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेची अन्य भागातील कामे पूर्णत्त्वाकडे चालली आहेत. मात्र, प्रभादेवी येथील भातणकर मार्गावरील रेल्वे पुलाचे काम बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाल्याने थांबले होते.
२ इमारतीच आता या पुलामुळे बाधित होणार असून त्यासाठी पुलाच्या मूळ आराखड्यातच एमएमआरडीएने बदल केला आहे.
आता वाहतूक पोलिसांच्या परवानगीची प्रतीक्षा
दरम्यान, नवीन पुलाच्या उभारणीसाठी सध्याचा अस्तित्त्वातील पूल पाडावा लागणार आहे. त्याच जागी दुमजली पुलाची उभारणी केली जाईल. मात्र, हा पूल पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांकडून पूल बंद करण्यास परवानगी मिळताच त्याचे पाडकाम सुरू होईल, असे सुत्रांनी सांगितले.
स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वेमार्गावर पूल
एमएमआरडीएकडून वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या भागात जगन्नाथ भातणकर मार्गावर दुमजली पुलाची उभारणी केली जाणार आहे.
त्यानुसार स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वेमार्गावर एक पूल उभारला जाईल. त्यावरून वरळी शिवडी उन्नत मार्गिका जाईल. यापूर्वीच्या आराखड्यानुसार पुलाच्या कामासाठी तब्बल १९ इमारती बाधित होणार होत्या.
त्यामुळे पुनर्वसनाचा खर्च प्रकल्पाच्या खर्चाहून अधिक होणार होता. परिणामी एमएमआरडीएने पुलाच्या आराखड्यात बदल करून त्याला मान्यता मिळवली. आता केवळ २ इमारती बाधित होतील.