Join us

अनेक क्रीडांगणांचं काम सुरू, उत्तर मुंबईला स्पोर्टस हब बनवणार : खासदार गोपाळ शेट्टी

By मनोहर कुंभेजकर | Published: December 02, 2023 3:31 PM

पोईसर जिमखाना ‘उत्तर मुंबई क्रीडा महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

मुंबई: कांदिवली पश्चिम पोईसर जिमखाना आंतरशालेय ‘उत्तर मुंबई क्रीडा महोत्सव’ २०२३ चा शुभारंभ आज सकाळी स्थानिक भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव येथे सुरू झाला असून यंदाचे २० वे वर्ष आहे. यावेळी खेळाडू वृत्तीने, खेळाच्या अटी पाळूया ही प्रतिज्ञा घेण्यात आली.‌ माजी रणजीपटू आणि बीसीसीआय मॅच रेफरी निशित शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.या क्रीडा महोत्सवात मुंबईतील अनेक शाळांचे आणि स्पोर्ट्स क्लबचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहे. 

यावेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले की, पोईसर जिमखाना १२ एकरवर पसरलेला आहे. उत्तर मुंबईत २०० एकर जागा विकासयोग्य आहे. त्यापैकी १२५ एकर जागा भाजपकडून विकसित करण्यात आली आहे. काही असामाजिक तत्वं या जागांवर अतिक्रमण करत असल्याच्या तक्रारी आरटीआय कार्यकर्ते करतात अशी माहिती त्यांनी दिली. मालाड पश्चिम अथर्व कॉलेजच्या जवळ येथे नोएडाच्या धर्तीवर आणि राज्यातील सर्वात मोठे उभारले जाणाऱ्या ६.५ एकरचे थीम पार्कचे भूमिपूजन उद्या होणार आहे. तसेच १.४ एकर महाराणा प्रताप क्रीडांगण, प्रमोद महाजन क्रीडांगण आदी अनेक क्रीडांगणे मी उत्तर मुंबईत विकसित केली असून काहींचे काम सुरू आहे. मला उत्तर मुंबईला स्पोर्टस हब बनवायचे आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की नेहमी मोठी स्वप्न बघा तेव्हाच तुम्ही ते मिळवण्यासाठी प्रयत्न कराल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे असंही ते म्हणाले.

आमदार योगेश सागर यांनी फलंदाजांना शुभेच्छा देऊन क्रिकेट खेळाचा शुभारंभ केला. यावेळी पोईसर जिमखाना अध्यक्ष मुकेश भंडारी, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, हर्षद मेहता, नेहा साप्ते, राष्ट्रीय शुटर, प्रेमनाथ कोटियन, पोईसर जिमखाना सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवात मुंबईतील विविध शाळा, क्लब्ज मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग आणि उदयोन्मुख क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिंच्या कलागुणांना वाव देणारा, एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा असा हा उत्तर मुंबई क्रीडा महोत्सव आहे. गेल्यावर्षी  ८ हजारांपेक्षा जास्त खेळाडू या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात सहभागी झाले होते.‌ क्रीडा प्रकारांमध्ये जलतरण, फुटबॉल, व्हॉलीबॉल,‌ बास्केटबॉल, हॅंडबॉल, क्रिकेट, बॉक्सिंग, बुद्धीबळ, जिमनॅस्टिक, ऍथलेटिक्स, मल्लखांब, स्केटिंग, कॅरम, टेबल टेनिस, बॅन्ड, मार्च पास, कराटे, आर्चरी, योग आदी खेळांचा समावेश असंल्याची माहिती करूणाकर शेट्टी यांनी दिली

टॅग्स :मुंबई