वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम लवकरच सुरू करणार : पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 05:46 IST2025-01-05T05:46:10+5:302025-01-05T05:46:32+5:30
‘उत्तर मुंबईतून ४० नगरसेवक निवडून आणू’

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम लवकरच सुरू करणार : पीयूष गोयल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गासाठी (कोस्टल रोड) प्रकल्पाला गती देण्यासाठी येत्या ४५ दिवसांत सर्व परवानग्या मिळतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी दिली. त्यानंतर तातडीने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई उत्तरमधील अनेक पायाभूत प्रकल्पाच्या सविस्तर चर्चेसाठी खासदार पीयूष गोयल यांनी शनिवारी पालिका मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी या प्रकल्पासंदर्भात माहिती दिली.
केंद्र सरकारकडून सागरीकिनारा व्यवस्थापन क्षेत्राची, तसेच पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. तरीही, या मार्गातील खारफुटी हटवण्यासाठी अद्याप केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची परवानगी मिळणे बाकी आहे. त्यानंतर त्याची माहिती उच्च न्यायालयात सादर करून मंजुरी मिळवावी लागणार आहे, असे ते म्हणाले. वर्सोवा ते दहिसरमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी कोस्टल रोडच्या बांधकामाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे.
असे चालणार काम
वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे काम एकूण सहा पॅकेजमध्ये चालणार असून, त्यासाठी चार बड्या कंत्राटदारांची निवड झाली आहे. या चारही कंपन्या सध्या मुंबईत बांधकामे सुरू असलेल्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत. एक वर्षापूर्वी या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र, मंजुऱ्यांअभावी हा प्रकल्प रखडला आहे. मात्र, लवकरच या परवानग्या मिळवून कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.
‘उत्तर मुंबईतून ४० नगरसेवक निवडून आणू’
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये उत्तर मुंबई विभागातून महायुतीचे ४० नगरसेवक जिंकून आणणार, असा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला. महापालिकेला शनिवारी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर मुंबईतून मिळालेले यश पाहता ४० जागा जिंकणे अवघड नसल्याचे ते म्हणाले. या संदर्भात आपण महापालिकास्तरावर कार्यकर्त्यांशी चर्चा करत असून तशा पद्धतीची रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला उत्तर मुंबई परिसरात चांगले यश मिळाले आहे. या ठिकाणी महायुतीचे पाच आमदार निवडून आले असून या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये महायुतीला मानणारा मतदार वर्ग आहे, असे त्यांनी सांगितले.