विक्रोळी उड्डाणपुलाच्या कामाला आला वेग; गर्डर टाकण्यासाठी महाकाय यंत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:14 AM2024-03-26T11:14:19+5:302024-03-26T11:15:30+5:30
विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुंबई :विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गर्डर टाकण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे महाकाय यंत्रे आणण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात गर्डरची कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.
पूर्वेकडून रेल्वे मार्गावरून पश्चिमेच्या टोकापर्यंत चार गर्डर टाकण्याचे काम शिल्लक आहे. त्यापैकी रेल्वे मार्गावर दोन गर्डर टाकले जातील. त्या आधी पूर्वेकडील भागात गर्डरचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर, रेल्वे मार्गावरून गर्डर टाकण्यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागेल. त्यासाठी रेल्वे प्रशासनासोबत पालिकेला बोलणी करावी लागतील. मेगा ब्लॉकचे ठरल्यानंतर गर्डर टाकण्याचा दिवस निश्चित होईल.
विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडण्याच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. २०१२ मध्ये पुलाची आखणी करण्यात आली. मात्र, २०२४ वर्ष उजाडले, तरी पुलाचे फक्त ७५ ते ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे. पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. पुलाच्या बांधकामासाठी अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने पूर्व द्रुतगती महामार्गापासून रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
मात्र, पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याची डागडुजी करता येत नाही. त्यामुळे या पावसाळ्यातही खराब रस्त्याचा सामना वाहन चालकांना करावा लागणार आहे.
चार किलोमीटरचा वळसा टळणार -
१) सध्या पूर्व आणि पश्चिम अशी ये-जा करायची असल्यास स्थनिकांना रेल्वे पादचारी पूल ओलांडावा लागतो.
२) वाहन चालकांना कांजूरमार्ग गांधीनगर किंवा घाटकोपर बसडेपोमार्गे विक्रोळी पश्चिमेला जावे लागते.
३) एकप्रकारे चार किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. नव्या उड्डाणपुलामुळे हा वळसा टळेल. मुंबई महापालिका हा पूल उभारत आहे.