Join us  

परळ टर्मिनसचे काम ‘फास्ट ट्रॅक’वर

By admin | Published: March 27, 2017 6:53 AM

मध्य रेल्वेच्या दादर आणि सीएसटी स्थानकातील लोकलचा ताण कमी करण्यासाठी

मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर आणि सीएसटी स्थानकातील लोकलचा ताण कमी करण्यासाठी परळ टर्मिनस नावारूपास येत आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या टर्मिनसच्या कामाला गती देण्यात येत असून आता प्लॅटफॉर्मचे काम वेगाने सुरू आहे. परळ टर्मिनसचे काम हे दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्लादरम्यान पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पातच परळ टर्मिनसही बांधण्यात येईल. दादर स्थानकमार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाईल. या टर्मिनसमुळे दादरबरोबर सीएसटीवरीलही लोकलचा भार कमी होण्यास मदत मिळेल. परळ टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. टर्मिनससाठी ५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या टर्मिनसचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी प्रथम प्लॅटफॉर्मचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली. टर्मिनस उभारणीसाठी त्या ठिकाणी असलेला मालगाडीचा ट्रॅक तोडून काम केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या कामात सर्वात शेवटी रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीमची (आरआरआय) कामे हाती घेण्यात येतील. हे काम सर्वात कठीण असून त्यासाठी थोडा वेळ लागेल. सर्वात व्यस्त अशा स्थानकांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येते. त्यामुळे लोकलची हाताळणी करणे सोपे जाते.त्याआधी यार्ड रिमॉडेलिंग, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची कामे करण्यावर भर दिला जात आहे. परळ स्थानकातील दादर दिशेला असलेला नवा पादचारी पूलही या कामात पाडण्यात येईल आणि याच स्थानकात मध्य भागात पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. तसेच करी रोड दिशेलाही विस्तार करतानाच सध्या असलेल्या पादचारी पुलाला दुसऱ्या बाजूलाही पायऱ्या बांधल्या जातील. (प्रतिनिधी)टर्मिनसचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे़ त्यासाठी वेगाने काम सुरू आहे़ काम पूर्ण झाल्यावर दादरची गर्दी कमी होईल़