Join us  

परळ टर्मिनसच्या कामाला अद्यापही मुहूर्त नाही

By admin | Published: July 09, 2016 2:18 AM

दादर स्थानकावरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी लोकलसाठी स्वतंत्र असे परळ टर्मिनस उभारण्यात येणार आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यात

मुंबई : दादर स्थानकावरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी लोकलसाठी स्वतंत्र असे परळ टर्मिनस उभारण्यात येणार आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यात काही किरकोळ कामे केली जाणार होती. मात्र, मध्य रेल्वेकडून परळ टर्मिनसच्या कामासाठी लागणाऱ्या जागेची अजूनही काही प्रक्रिया पार पाडण्यात आल्या नसून, त्यामुळे हे काम रखडले आहे. एकूणच पाहता टर्मिनसच्या कामाला पावसाळ्यानंतरचाच मुहूर्त मिळाला आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्लादरम्यान पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पातच परळ टर्मिनसही बांधण्याचा प्रस्ताव आहे. दादर स्थानकामार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. टर्मिनससाठी ५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परळ टर्मिनस उभारण्यासाठी मालगाडीचा ट्रॅक तोडण्यात येणार आहे. हा ट्रॅक काढून मिळालेल्या संपूर्ण जागेत परळ टर्मिनस उभारले जाईल. टर्मिनसच्या कामात सर्वांत शेवटची रूट रिले इंटरलॉकिंग सीस्टिमची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या आधी यार्ड रिमॉडेलिंग, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची कामे होतील. मात्र, मालगाडीचा ट्रॅक तोडण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुख्य विभागीय कार्यालयाकडून तो रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला हस्तांतरित करणे गरजेचे आहे. त्याची अद्यापही पूर्तता रेल्वेकडून करण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले, तसेच अन्य काही कामेही मार्गी लावण्यासाठी मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली नसून, त्यामुळे परळ टर्मिनसच्या कामाला सुरुवात झालेली नाही. (प्रतिनिधी)