Join us

उद्यानाचे काम मेट्रोमुळे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:45 AM

पवई तलाव क्षेत्र मगरीचे उद्यान तयार करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र मेट्रो रेल्वे ६च्या कामात हे क्षेत्र बाधित होणार असल्याने मगरीचे उद्यान रखडणार आहे.

मुंबई : पवई तलाव क्षेत्र मगरीचे उद्यान तयार करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र मेट्रो रेल्वे ६च्या कामात हे क्षेत्र बाधित होणार असल्याने मगरीचे उद्यान रखडणार आहे. त्यामुळे मगर उद्यानासाठी मागविलेल्या निविदांना स्थगिती दिल्याचे पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत आज सांगितले.पवई तलावात मुंबईतील पहिले मगरीचे उद्यान व पर्यटन विकसित करावे, अशी ठरावाची सूचना काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक प्रवीण छेडा यांनी मांडली होती. या सूचनेला आयुक्तांनी अनुकूलता दर्शविली होती. त्यानुसार पवई तलावाचे संवर्धन करण्यासाठी व तलावाच्या पाण्याची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने पालिकेने प्रयत्न सुरू केले. एरिशन व डिओ मोनेटरिंग सिस्टिम बसवून पवई तलावात येणारे सांडपाणी वळविण्यासाठी पाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्प खात्यामार्फत निविदाही मागविण्यात आल्या.मगरींसाठी स्वतंत्र उद्यान विकसित करण्याचे ठरले. हे काम फेब्रुवारी २०१८पर्यंत सुरू होणार होते. मात्र प्रस्तावित मुंबई मेट्रो ६च्या कामामुळे हे काम बाधित होणार असल्याने संबंधित निविदेला प्रशासनाने स्थगिती दिली. दरम्यान, तलावात जाळ्या लावून करण्यात येणाऱ्या अनधिकृत मासेमारीला बंदी घालावी, तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी, नादुरुस्त झडपा दुरुस्ती करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीत केली. यावर उचित कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.