जोगेश्‍वरी रेल्वे स्थानक येथील पादचारी पूलाचे काम एप्रिलपर्यंत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:09 AM2021-03-04T04:09:03+5:302021-03-04T04:09:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध कारणांमुळे गेली अनेक वर्ष रखडलेल्या जोगेश्‍वरी पूर्व रेल्वे फाटकाजवळील पादचारी पुलाचे काम प्रगतीपथावर ...

Work on the pedestrian bridge at Jogeshwari railway station will be completed by April | जोगेश्‍वरी रेल्वे स्थानक येथील पादचारी पूलाचे काम एप्रिलपर्यंत होणार पूर्ण

जोगेश्‍वरी रेल्वे स्थानक येथील पादचारी पूलाचे काम एप्रिलपर्यंत होणार पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विविध कारणांमुळे गेली अनेक वर्ष रखडलेल्या जोगेश्‍वरी पूर्व रेल्वे फाटकाजवळील पादचारी पुलाचे काम प्रगतीपथावर असून, ते एप्रिल २०२१पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती विधानसभेत दिली.

जोगेश्‍वरी पूर्व रेल्वे स्थानकाजवळील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी जोगेश्‍वरी येथील स्थानिक व रेल्वे प्रवासी यांच्या सोयीसाठी जोगेश्‍वरी पूर्व ते जोगेश्‍वरी पश्‍चिम या दरम्यान आकाश मार्गिका (स्काय वॉक) बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ही आकाश मार्गिका जोगश्‍वरी (पूर्व) येथील ईस्माईल युसुफ महाविद्यालयापाशी सुरु होऊन जोगेश्‍वरी (पश्‍चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गाच्या पश्‍चिम पदपथावर माल्कम बागेपर्यंत बांधण्यात येणार आहे. या आकाश मार्गिकेवर चढण्या अथवा उतरण्याकरिता सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. या पुलाच्या कामासाठी तब्बल १० कोटी १२ लाख २९ हजार ८५८ इतक्या रकमेला मंजुरीही देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, सप्टेंबर २०१६मध्ये या कामाचे कार्यादेश देण्यात आले होते, अशी माहिती वायकर यांनी दिली.

यावर नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाचे काम प्रगतीपथावर असून, एप्रिल २०२१पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली असल्याचे सभागृहाला सांगितले. तसेच सध्या या पुलाला सरकते जिने बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून, भूमिगत सेवा, विद्युत वाहिन्या, अरुंद रस्ता, बांधकामे स्थलांतरित करणे, कोरोना प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे या प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला दिली. परंतु, विलंबामुळे प्रकल्पाच्या मूळ किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही, असेही सांगितले.

जोगेश्‍वरी पश्‍चिमेकडील एस. व्ही. रोडवरील माल्कम बागलगतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रलंबित असल्याने जिना उतरवणे शक्य होत नसल्याने हा पादचारी पूल जोगेश्वरी बस डेपोसमोरील रस्त्याच्या पदपथावर उतरविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शिंदे यांनी दिली.

Web Title: Work on the pedestrian bridge at Jogeshwari railway station will be completed by April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.