म्हाडाचा अतिक्रमण विभाग स्थापन करण्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:43 AM2019-11-12T05:43:20+5:302019-11-12T05:43:23+5:30
मुंबईमधील म्हाडाच्या मोक्याच्या जागेवर वेगाने अतिक्रमण होत आहे.
मुंबई : मुंबईमधील म्हाडाच्या मोक्याच्या जागेवर वेगाने अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण थांबविण्यासाठी म्हाडाने पालिकेच्या धर्तीवर स्वतंत्र असा अतिक्रमण निष्कासन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी १० कोटी रुपयांची तरतूदही करून ठेवण्यात आली आहे. मात्र अद्याप म्हाडाच्या मुंबई मंडळाचा अतिक्रमण निष्कासन विभाग प्रत्यक्षात सुरू झाला नसल्याने ती फक्त घोषणाच ठरली आहे.
मुंबईमध्ये जागेची कमतरता आणि किमतीही वाढलेल्या असल्याने अनेकवेळा अतिक्रमण करून जमिनी बळकावण्याचे प्रकार घडत आहेत. म्हाडा वसाहतीमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामे झाल्याच्या हजारो तक्रारी म्हाडाकडे आल्या आहेत.
दिवसेंदिवस म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हाडाला महापालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे कारवाई करण्ये त्यांच्यासाठी कठीण होत असून वेळखाऊदेखील होत आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई जलद गतीने न झाल्यामुळे इतर ठिकाणीही अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे सुरू करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे ही कारवाई लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन या कारवाईसाठी स्वत:ची अतिक्रमण निष्कासन यंत्रणा उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने डिसेंबर २०१८ मध्येच घेतला आहे.
मात्र, हा निर्णय घेऊन तब्बल एक वर्ष पूर्ण होत आले तरीही हा विभाग सुरू न झाल्याने हा विभाग स्थापन करण्याचे काम नेमके का रखडले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.