मुंबई : जोगेश्वरी येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. स्कायवॉक बांधण्याची मुदत संपली, तरी अर्धेसुद्धा काम झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना येथून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वेकडे स्कायवॉकचे पीलर टाकण्यात आले आहेत, परंतु पश्चिमेला कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही.आता स्कायवॉक बांधण्याची मुदत संपली असून, सहा महिन्यांचा कालावधी बांधकामासाठी वाढवून देण्यात आला आहे. संथगतीने सुरू असलेल्या कामावरून पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण होईल का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. जोगेश्वरी स्कायवॉक बांधण्यासाठी ९.७२ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. स्कायवॉक बांधण्याची अंतिम तारीख ३१ मार्च, २०१८ ही होती. मात्र, दिलेली वेळ संपली असून, पुन्हा सहा महिने वाढवून देण्यात आले आहे. कंत्राटदार काम करत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा? सरकार निवडणुकीची वाट पाहत आहे का? स्कायवॉक प्रकल्पाचा खर्च वाढविण्यासाठी कामात दिरंगाई करत आहात का? जोगेश्वरीकरांच्या त्रासाला जबाबदार कोण? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशा प्रकारचे प्रश्न आम आदमी पक्षाने उपस्थित केले आहेत. नुकताच आप पक्षाने स्कायवॉक संदर्भात हल्ला बोल मोर्चा इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी घेऊन प्रशासनाचा निषेध केला होता.नवलकरवाडी मंडईतील व्यापारी, दुकानदार यांना स्कायवॉकच्या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, महापालिकेचे प्रमुख पूल अभियंता संजय दराडे यांनी सांगितले की, जोगेश्वरी स्कायवॉकबद्दल माहिती घ्यावी लागले. सोमवारी रीतसर माहिती घेऊन कळवितो.वाढत्या समस्या...जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडणाºयांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एखादा अपघात झाला, तर रुग्णवाहिका जाण्यासाठीही पुरेशी जागा नाही. येथे फेरीवाल्यांचेही प्रमाण वाढू लागले आहे. नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो.स्कायवॉक पूर्ण करण्याच्या कामाची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपली आहे. दुसºया मुदतीचे फक्त पाच महिने शिल्लक आहेत. धिम्या गतीने काम सुरू असल्याने पुढील पाच महिन्यांत स्कायवॉकचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या पूल विभागाने लवकरात लवकर मुदतीत काम पूर्ण करावे.- पंकज यादव, स्थानिक नगरसेवकजोगेश्वरी रेल्वे स्थानकावरून कामानिमित्त रोज प्रवास करतो. रेल्वे स्थानकाचा पूल उतरल्यावर फेरीवाल्यांचा त्रास आणि आता स्कायवॉकच्या कामाच्या साहित्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. स्कायवॉकचे गेल्या एक वर्षापासून काम सुरू आहे. २० टक्केही काम अजून झालेले नाही.- आशीर्वाद कुबडे, प्रवासी
जोगेश्वरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकचे काम पूर्ण होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 4:56 AM